महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात का? नेमकं काय झालंय? बाळासाहेब थोरातांनीच सांगितलं कारण, म्हणाले... | Balasaheb Thorat tell why he is in Hospital for more than 1 month | Loksatta

महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात का? नेमकं काय झालंय? बाळासाहेब थोरातांनीच सांगितलं कारण, म्हणाले…

बाळासाहेब थोरात हे महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात का होते? त्यांच्यावर नेमके काय उपचार झाले? याविषयी स्वतः बाळासाहेब थोरातांनीच उत्तर दिलं आहे.

Balasaheb Thorat on Congress dispute 2
बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे विधीमंडळ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात मागील अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. या काळात त्यांनी सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षातही मौन बाळगले. रविवारी (५ फेब्रुवारी) थोरात संगमनेरमधील एका कार्यक्रमात सहभागी होतील, अशी चर्चा होती. मात्र, तेथेही ते गैरहजर राहिले. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात हे महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात का होते? त्यांच्यावर नेमके काय उपचार झाले? याविषयी स्वतः बाळासाहेब थोरातांनीच उत्तर दिलं आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “खरं म्हणजे संगमनेरमधील कार्यक्रमाला मीही आपल्यात असलो पाहिजे होतो. परंतु, नागपूर अधिवेशनाच्यावेळी २६ डिसेंबरला मी मॉर्निंग वॉकला गेलो आणि एका खड्ड्यात पाय पडून तोल गेला. त्यामुळे पडलो आणि काही जखमा झाल्या. खांद्याचा सांधा मोडला. त्याचे दोन तीन भाग झाले.”

“सांध्यात काही तारा टाकून ते हाडाचे तुकडे बांधले होते”

“यानंतर माझ्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. सांध्यात काही तारा टाकून ते हाडाचे तुकडे बांधले होते. त्यामुळे महिनाभर हे सर्व जपावं लागलं होतं. अजूनही डॉक्टरांनी प्रवास करू नये, असं सांगितलं. त्यामुळे मी येऊ शकलो नाही. मी एक महिना संगमनेरच्या जनतेपासून दूर राहिलो असा माझ्या जीवनात कोणताच कालखंड नाही,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

“सर्व संगमनेर तालुका एक कुटुंब आहे”

थोरात पुढे म्हणाले, “मी कायम आठ किंवा १५ दिवसांनी आपल्या लोकांमध्ये येत असतो. त्यांच्या सुख-दुःखात येत असतो. विकास कामांमध्ये भाग घेतो, संस्थांच्या कामांबाबत बैठका करतो. सर्व संगमनेर तालुका एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाची काळजी घ्यावी तसं आपण सर्व हा तालुका पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो. त्यात आपण यशस्वी झालो आहोत.”

हेही वाचा : “तुम्ही बाळासाहेब थोरातांना फोन करणार का?”, नाना पटोले म्हणाले, “आमचं त्यांच्याबरोबर…”

“संगमनेर तालुक्याची वाटचाल पाहिली तर महाराष्ट्रातील सर्वात विकसित तालुक्यांपैकी एक आहे. इथं सर्वात चांगलं राजकारण आहे. सर्वात सुसंस्कृत राजकारण आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 10:41 IST
Next Story
“…तर काँग्रेसने कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, हे घोषित करावं”; चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंना आव्हान