काँग्रेसचे विधीमंडळ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची बदनामी आणि चारित्र्यहनन कधीपासून सुरू झालं आणि ते कोणी केलं याबाबत माहिती असल्याचं म्हटलं. या व्हिडीओत राहुल गांधीचा राजकारणात प्रवेश झाल्यापासून कशा आणि कोणत्या घटना घडल्या याचीही माहिती देण्यात आली आहे. तसेच भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हा व्हिडीओ भारत जोडो यात्रेच्या लोगोसह शेअर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळासाहेब थोरात यांनी व्हिडीओ पोस्ट करत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, “राहुल गांधींची बदनामी आणि चारित्र्यहनन कधीपासून सुरू झालं आणि कुणी केलं? व्हिडीओ नक्की बघा.”

बाळासाहेब थोरातांनंतर स्वतः राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटर हँडलवर माझ्या माध्यमांमधील प्रतिमेमागील सत्या जाणून घ्यायचं आहे का असं विचारत याच व्हिडीओची युट्यूब लिंक शेअर केली आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हिडीओत राहुल गांधी म्हणत आहेत, “जेव्हा मी सुरुवातीला राजकारणात आलो तेव्हा साधारणपणे २००४ ते २००९ पर्यंत भारतातील सर्व माध्यमं माझं कौतुक करत होती. त्यानंतर मी दोन मुद्दे उपस्थित केले. त्यातील एक नियामगिरीचा प्रश्न होता आणि दुसरा भट्टा-पर्सोलचा प्रश्न होता. त्यावेळी मी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत मजबुतीने उभी राहील असं म्हटलं.”

“…त्या क्षणी माध्यमांमध्ये माझं चारित्र्यहनन सुरू झालं”

“ज्या क्षणी मी हे जमिनीचे प्रश्न उपस्थित केले आणि गरिबांच्या अधिकारासाठी आवाज उंचावला त्या क्षणी माध्यमांमध्ये माझं चारित्र्यहनन सुरू झालं. आम्ही आदिवासींसाठी पेसा कायदा आणला, वनाधिकार कायदा आणला, जमीन अधीकरण विधेयक आणलं आणि तेव्हापासून या सर्वांनी २४ तास माझ्याविरोधात लिहिणं सुरू केलं,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

व्हिडीओ पाहा :

“आम्ही राजा-महाराजांकडून देशातील जनतेकडे दिली”

राहुल गांधी पुढे म्हणाले, “भारताची जी संपत्ती होती ती आम्ही राजा-महाराजांकडून देशातील जनतेकडे दिली. आता भाजपा त्याच्या उलटं करत आहे. आता या जनतेची संपत्ती त्यांच्याकडून ओरबाडून या राजा-महाराजांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील जनता, आदिवासी लोक, गरीब लोक एकत्र उभे राहिले, तर हे काम खूप सोपं आहे. मात्र, विखुरलेले राहिले तर हे काम अशक्य आहे.”

“भाजपाने माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले”

“भाजपाने माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. लोकांना वाटतं असं करणं माझ्यासाठी नुकसान करणारं आहे. मात्र, याचा माझ्यावर परिणाम होत नाही. सत्य कोणत्या ना कोणत्या स्वरुपात बाहेर येतंच. ते माझी प्रतिमा खराब करायला जेवढा खर्च करत आहेत, तेवढी ताकद ते मला देत आहेत.कारण सत्य झाकून ठेवलं जाऊ शकत नाही किंवा दडपलं जाऊ शकत नाही,” असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.

हेही वाचा : विश्लेषण : आदिवासी आणि वनवासी शब्दावरून घमासान, राहुल गांधींचा आक्षेप आणि भाजपा-RSS चं स्पष्टीकरण काय?

“मोठ्या शक्तींविरोधात लढलं की व्यक्तिगत हल्ले होतात”

“जर मी मोठ्या शक्तींच्या विरोधात लढत असेल, तर माझ्यावर व्यक्तिगत हल्ले होतील. त्यामुळे मला माहिती आहे की, जेव्हा माझ्यावर व्यक्तिगत हल्ले होतात तेव्हा मी योग्य काम करत आहे, योग्य दिशेने जात आहे. हा एक प्रकारे माझा गुरू आहे. हा गुरू मला कोठे जायचं हे सांगतो. त्यामुळे मी या लढाईत पुढे जात आहे आणि पुढे जातोय तर सगळं योग्य आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat tweet a video telling when who doing character assassination of rahul gandhi pbs
First published on: 04-12-2022 at 18:49 IST