सांगली : अखेरच्याक्षणी भाजप जत तालुकाध्यक्षांचे नाव पॅनेलमधून वगळल्याने सांगली बाजार समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असल्याची घोषणा माजी आमदार विलासराव जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी केली. खासदार संजयकाका पाटील यांनी दबाव आणून हा प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला.
बाजार समिती संचालक मंडळाच्या १८ जागासाठी निवडणूक होत असून ९० उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी महाविकास आघाडीविरुध्द भाजप असा सामना होत असल्याचे स्पष्ट झाले होते.आज चिन्ह वाटपावेळी पॅनेलमधील उमेदवारांची यादी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करीत असताना जत तालुकाध्रक्ष प्रमोद सावंत यांचे नाव वगळण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या जगताप यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. यामुळे महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी पॅनेलसाठी ही निवडणुक एकतर्फी होण्याची शक्यता आहे.
