scorecardresearch

आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत सोलापुरात ध्वनिवर्धक भिंतीवर बंदी कायम; कार्यकर्त्यांचे पोलीस प्रशासनाविरुद्ध आंदोलन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणकारी ध्वनिवर्धक भिंती वापरण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळ व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणकारी ध्वनिवर्धक भिंती वापरण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यामुळे डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळ व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन तर दुसरीकडे डॉ. आंबेडकर पार्क चौकात अचानकपणे मानवी साखळी करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पोलिसांनी भले खटले भरावेत, पण मिरवणुकीत ध्वनिवर्धक यंत्रणा वापरणारच, असा इशारा आंदोलकांनी दिला. एवढेच नव्हे तर जयंती उत्सव १७ एप्रिलच्या पुढे ३० एप्रिलपर्यंत साजरा करण्याचाही इशारा डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळाने दिला आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने मिरवणुकीत एक बेस ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यास परवानगी देण्याची भूमिका मांडल्याचे मध्यवर्ती मंडळाच्या विश्वस्त समितीचे राजा सरवदे यांनी सांगितले. परंतु किमान दोन बेस व दोन ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यास परवानगी मिळण्याची आपली मागणी कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्याशी संपर्क साधून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्याची माहितीही सरवदे यांनी दिली. उद्या शहर व परिसरात सुमारे २०० सार्वजनिक मंडळांमार्फत डॉ. आंबेडकर जयंती उत्सवास प्रारंभ होणार असून १७ एप्रिल रोजी संयुक्त मिरवणुकीने जयंती उत्सवाचा समारोप होणार आहे. मिरवणुकीत डीजेसारख्या ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्याची तयारी बहुसंख्य मंडळांनी केली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिप्रदूषण वाढविणाऱ्या यंत्रणा वापरण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. या मुद्यावर काल मंगळवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत वाद उफाळून आला.

ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यास आम्हांला कोणीही रोखू शकत नाही, असा डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळांचा हेका आहे. तर पोलीस आयुक्त बैजल यांनी हा कायदा कोणालाही मोडता येणार नाही, असे ठणकावून सांगितले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळाने आपल्या भूमिकेवर ठाम राहात धरणे आंदोलन केले.

आंबेडकर जयंतीसाठी व्यापाऱ्याला खंडणीची मागणी

सोलापूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वर्गणीच्या नावाखाली व्यापाऱ्याकडून बळजबरीने खंडणी मागून धमकावण्याचा प्रकार सोलापुरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात राजूराम शंकरराम खोत (वय ३०, मूळ रा. राजस्थान, सध्या रा. सुयोगसृष्टी अपार्टमेंट, शेळगी, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार राजूराम खोत हे काम करीत असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीजवळील सोलापूर टेक्स्टाईल मार्केट या दुकानात चिंटू कांबळे (रा. बुधवार पेठ, सोलापूर) व इतर दोन साथीदारांनी येऊन छत्रपती शाहू महाराज बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळासाठी २१ हजार रुपयांची वर्गणी मागितली. त्या वेळी कांबळे याने खोत यांना, तुमच्या मालकाशी फोन जोडून देण्यास सांगितले. वाद घालून कांबळे व त्याच्या साथीदारांनी २१ हजारांची वर्गणी न दिल्यास येथे दुकान चालू देणार नाही, तुम्ही दुकानात काम कसे करता हे बघतोच, असे धमकावत बळजबरीने खंडणी मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ban loudspeakers solapur ambedkar jayanti celebrations activists protest police administration ysh

ताज्या बातम्या