​सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील सटमटवाडी परिसरात मृत माकड सापडल्याच्या घटनेनंतर परिसरात माकडतापाची (के.एफ.डी.) धास्ती पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून युद्धपातळीवर तपासणी मोहीम हाती घेतली असून, पुणे येथील प्रयोगशाळेतील विशेष पथकाने घटनास्थळी दाखल होऊन गोचीडींचे नमुने गोळा केले आहेत.

पुणे येथील वैद्यकीय प्रयोगशाळेचे विशेष पथक बांदा परिसरात दाखल झाले. या पथकाने पूर्ण सुरक्षात्मक साधने (पीपीई किट) परिधान करून मृत माकड आढळलेल्या परिसराची सखोल पाहणी केली. झाडाझुडपांमध्ये आणि गवताळ भागात शोधमोहीम राबवून गोचीडी गोळा करण्यात आल्या आहेत. या गोचीडींमधून माकडतापाचा विषाणू पसरतो का, याची तपासणी आता पुण्याच्या प्रयोगशाळेत केली जाणार असून, त्याचा अहवाल आठ दिवसांत प्राप्त होईल, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून बांदा परिसरात माकडांच्या मृत्यूच्या घटना सुरूच आहेत. त्यातच डिंगणे येथील बांबरवाडी परिसरात मृत माकडाच्या शरीराचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच वनविभाग आणि आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली. या भागात आधीच माकडतापाचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

​नागरिकांना खबरदारीचे आवाहन

सध्या आरोग्य विभाग, वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर संयुक्तरीत्या लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ​जंगल किंवा झाडीच्या परिसरात जाताना पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे परिधान करावेत.​ अंगावर गोचीड चावल्याची लक्षणे दिसल्यास विलंब न करता नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

​प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर माकडतापाचा धोका लक्षात घेऊन पुढील उपाययोजना केल्या जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान काजू पिकाचा हंगाम असल्याने बागायतदार काजू गोळा करण्यासाठी बागायती मध्ये जात आहेत. त्यांना आता भिती वाटत असून रोजंदारीवर काम करत असलेले कामगारही चिंताग्रस्त झाले आहेत.