Bandra Demolition: पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे रेल्वेच्या रुळांजवळ असणारे अतिक्रमण हटविण्यास रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने मंगळवारी सुरुवात केली. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी देखील येथील गरीब नगर परिसरात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम सुरु आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरु असलेल्या या कारवाईला बुधवारी काही स्थानिकांनी कडाडून विरोध केला. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. पोलिसांकडूनही सौम्य लाठजार्च करण्यात आला. याप्रकारानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी काही प्रश्न उपस्थित करत भाजपावर जोरदार टीका केली.

हिंदू-मुस्लिम फॅक्टर आणणं भाजपाची स्टॅटेजी – वरुण सरदेसाई

“वांद्रे (पूर्व) येथे रेल्वेच्या रुळांलगत असणारी गरीब नगर वस्ती आहे. या जागेत पश्चिम रेल्लेला ट्रॅक टाकून जास्त ट्रेन सोडायच्या आहेत, याला वांद्रे टर्मिनस आणि स्थानक जोडायचं आहे”, असे वरुण सरदेसाई म्हणाले. “जमीन मोकळी करण्यासाठी पश्चिम रेल्वे आणि गरीब नगर रहिवासी यांच्यात उच्च न्यायालयात खटला सुरु होता. निकालानंतर न्यायालयाने अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर तोडक कारवाई सुरु झाली. पण, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं, हिंदू-मुस्लिम फॅक्टर आणणं भाजपाची स्ट्रॅटेजी आहे”, असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला.

धार्मिक रंग देण्याचा प्रकार भाजपाने केल्याचा आरोप

पायाभूत सुविधांसाठी होणाऱ्या कामाला जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रकार भाजपाने केल्याचा आरोप सरदेसाईंनी केला. भाजपाचा महापौर झाला म्हणून, मुख्यमंत्र्यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली, असं चुकीचं नरेटिव्ह समाज माध्यामांतून पसरवला जात आहे. वरुण सरदेसाईंना यामुळे धक्का लागल्याचे पसरवलं जात असल्याचे सरदेसाई म्हणाले.

“२०२१ च्या सर्वेनुसार सर्वे झालेल्यांचे अधिकार अबाधित ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत. इथल्या रहिवाशांनी सर्व घरांचा सर्व्हेच झाला नाही असं मला सांगितलं. सर्व्हे पूर्ण करुन घेणं आधीच्या आमदारांचं काम होतं. पण ते झालं नाही. रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन विकासाला विरोध नाही, वांद्रे पूर्व स्थानक स्वच्छ व्हावं असं सांगितलं. सर्वे झाला असता तर न्यायालयाने ज्याप्रकारे १०० लोकांचे अधिकार अबाधित ठेवले तसंच इतरांचेही ठेवले असते. त्यांना घरं मिळाली असती. पण मुद्दामून त्याला धार्मिक रंग दिला जात आहे,” असे वरुण सरदेसाई म्हणाले.

वांद्रे काय बांगलादेशच्या सीमेवर आहे का? – सरदेसाई

वरुण सरदेसाईंनी यावेळी भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्यावर टीका केली. सोमैय्या तिथं जाऊन बांगलादेशी घुललेत म्हणतात पण याचा संबंध येतो कुठे असा सवाल सरदेसाईंनी उपस्थित केला. बांगलादेशी होते तर कारवाईनंतर कुठे गेले? बांगलादेशसाठी सोमैय्यांनी ट्रेन केलीय का? विमान, बस पाठवली का? वांद्रे काय बांगलादेशच्या सीमेवर आहे का? १२ वर्षे मोदींचे सरकार असताना बांगलादेशी आले कसे? त्यांना मतदानपत्र कशी मिळाली, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? अशा पश्नांची सरबत्ती सरदेसाईंनी केली.

सरदेसाई यांनी लाठीजार्चवर भाष्य करताना यात लोकांची डोकी भडकवण्यात अजित पवार यांच्या पक्षाच्या लोकांचा हात असल्याचा आरोप केला. त्यांच्यासह किरीट सोमैय्यांवर कारवाईची मागणीही सरदेसाईंनी केली.