उद्धवजी या ‘खेकड्याची नांगी मोडा’ म्हणत तानाजी सावंतांविरोधात बॅनरबाजी

सोलापुरात तानाजी सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत हे चांगलेच नाराज झाले आहेत. एवढंच नाही तर तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला साथ दिली. ज्यानंतर त्यांच्याविरोधात सोलापुरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

काय आहे बॅनरमध्ये?
एका खेकड्याचा भलामोठा फोटो दाखवण्यात आला आहे. त्याच्या खेकड्याच्या फोटोच्या मध्यभागी तानाजी सावंत यांचा फोटो आहे. ‘उद्धवसाहेब हा खेकडा तर सोलापूर व धाराशिवची शिवसेना पोखरत आहे. वेळीच त्यांच्या नांग्या मोडा’- निष्ठावंत शिवसैनिक
असा मजकूरही या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

तानाजी सावंत यांना खेकड्याच्या रुपात का दाखवण्यात आलं?
महायुतीचं सरकार राज्यात असताना तानाजी सावंत हे जलसंधारण मंत्री होते. रत्नागिरीमधले तिवरे धरण फुटले आणि १९ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिवरे धरण खेकड्यांनी पोखरलं त्यामुळे ते धरण फुटलं असा दावा तानाजी सावंत यांनी केला होता. ज्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. एवढंच काय राष्ट्रवादी काँग्रेसने तर खेकडे घेऊन पोलीस ठाण्यात जात धरण फोडणाऱ्या खेकड्यांना अटक करा अशी मागणी करत आंदोलन केलं होतं. आता नाराज तानाजी सावंत यांनी भाजपाची साथ दिल्याने शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर त्यांना खेकड्याच्या रुपात दाखवण्यात आलं आहे.

सोलापुरातील मॅकनिक चौकात तानाजी सावंत यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आला आहे. हा बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे. तानाजी सावंत यांचा उल्लेख या बॅनरमध्ये खेकडा असा करण्यात आला आहे. आता तानाजी सावंत यावर काही भाष्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास सुमारे महिन्याभराचा कालावधी गेला. या विस्तारानंतर आणि खातेवाटपानंतर अनेकांच्या नाराजीच्या बातम्याच समोर आल्या. जसे काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार नाराज झाले तसेच शिवसेनेचे तानाजी सावंतही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झाले. आता त्यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Banner against unhappy minister tanaji sawant in solapur by shivsena scj

ताज्या बातम्या