Ajit Pawar Plane Crash Safety Upgrade at Baramati Airport: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह दोन वैमानिक, एक फ्लाईट अटेंडंट आणि एक सुरक्षा रक्षक अशा इतर चार जणांचाही मृत्यू झाला होता. या घटनेला नऊ महिने उलटल्यानंतर राज्य शासनाने बारामती विमानतळाच्या सुरक्षेत आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बारामती विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांसाठी राज्य सरकारने गुरुवारी ६५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली. धावपट्टीचे डांबरीकरण, धावपट्टीच्या बाजूला सुरक्षित मोकळा भाग बांधणे आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) टॉवर उभारणीचा या कामामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी याविषयी माहिती दिली. “दीर्घ प्रयत्नांनंतर बारामती विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ६५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास गुरुवारी शासनाची मंजुरी मिळाली आहे,” असे त्यांनी सांगितले असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
दीपक कपूर पुढे म्हणाले, “पहिल्या टप्प्यात सध्याच्या धावपट्टीचे डांबरीकरण करून ती अधिक सक्षम करणे, धावपट्टीच्या बाजूला सुरक्षित मोकळा भाग बांधणे, जमिनीचे सपाटीकरण, संरक्षक भिंत आणि सुसज्ज एटीसी टॉवर उभारण्यात येणार आहे. याशिवाय तांत्रिक विभाग, अग्निशामक केंद्र, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आणि अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे नियोजन आहे. कामाला गती देण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू केली जाईल. यासाठी शुक्रवारपासूनच निविदा मागवण्यात येत असून बारामती विमानतळाचा कायापालट जलद गतीने केला जाईल.”
तज्ज्ञांचे मत काय?
विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विश्लेषक धैर्यशील वंडेकर यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच काही महत्त्वाच्या त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीत ते म्हणाले, “पहिल्या टप्प्याची मंजुरी हे सुरक्षिततेच्या दृष्टीने उचललेले सकारात्मक पाऊल आहे. मात्र केवळ एटीसी टॉवर उभारून अनियंत्रित विमानतळाचे थेट नियंत्रित विमानतळात रूपांतर होऊ शकत नाही.”
वंडेकर यांच्या मते, एटीसी टॉवर प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यासाठी प्रशिक्षित आणि परवानाधारक मनुष्यबळ, एसओपी, विश्वासार्ह दळणवळण साधने, हवाई क्षेत्राचे नियोजन आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) नियमांनुसार सर्व परवानग्या मिळणे आवश्यक आहे.
याशिवाय रात्रीच्या वेळी सुरक्षित उड्डाणासाठी ‘प्रेसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर’ प्रणाली, धावपट्टीवरील योग्य प्रकाशयोजना आणि इतर दृश्यमानता वाढविणारी साधणे असणे गरजेचे आहे. हवामानाची अचूक माहिती तत्काळ मिळण्यासाठी ‘ऑटोमॅटिक वेदर ऑब्झर्व्हिंग सिस्टीम’ बसवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
बारामती विमानतळावर अनेक अपघात
२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवारांच्या विमान अपघातामुळे बारामती विमानतळावरील सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला. या अपघातात अजित पवारांसह अन्य चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता.
विमान अपघात तपास ब्युरोने (एएआयबी) प्राथमिक तपास अहवालात विमानतळावरील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या होत्या. बारामतीमध्ये हवामानाचा अंदाज देणारी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नव्हती आणि वाऱ्याची दिशा दर्शवणाऱ्या ‘विंड सॉक्स’व्यतिरिक्त इतर कोणतेही नेव्हिगेशनल सहाय्य उपलब्ध नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे धावपट्टीचे शेवटचे डांबरीकरण मार्च २०१६ मध्ये झाले होते. त्यानंतर डागडुजी न झाल्याने धावपट्टीवरील खुणा पुसल्या गेल्या होत्या आणि पृष्ठभागावर खडी उखडलेली आढळली होती.
या अपघातानंतरही मे आणि ऑगस्ट २०२६ मध्ये प्रशिक्षणार्थी विमानांच्या अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. ९ ऑगस्ट रोजी कार्व्हर एव्हिएशन ॲकॅडमीचे एक प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवरून घसरले होते.
