Baramati Assembly Election latest news : केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवरून महायुतीने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता महायुतीकडून प्रयत्न सुरू असले तरीही काँग्रेस या ठिकाणाहून उमेदवार देणार असल्याचं निश्चित केलं आहे. याबाबत आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचे अधिकृत भूमिका जाहीर केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी केली आहे. यासंदर्भात राज्यस्तरावरील सर्व नेत्यांशी चर्चा झाली असून राष्ट्रीय स्तरावरही संवाद सुरू आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाही आमची भूमिका कळवली आहे.”
बारामती विधानसभा मतदरसंघासाठी काँग्रेसकडून उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर केला जाईल, असंही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तसंच, बिनविरोध निवडीसाठी चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून कोणीही संपर्क केला नसून भाजपाकडूनही कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं.
विरोधकांना लढायचे असल्यास त्यांनी लढावे
बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना जय पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवारही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बारामतीमधील सर्व जनतेलाही ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटत आहे. ही निवडणूक होणेच दुःखाची गोष्ट आहे. काँग्रेस उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. विरोधकांना ही निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी लढावी, असेही ते म्हणाले.
अजित पवार हयात असताना त्यांनी लोकशाहीला प्रथम ठेवले होते. त्यांनी कधीही कुणाला निवडणूक लढण्यापासून रोखले नाहीत. आम्हीही त्यांचेच विचार घेऊन पुढे जात आहोत. बारामतीमधील लोक अजित पवारांच्या निधनानंतर खूप भावनिक आहेत. त्यामुळे विरोधकांना ही निवडणूक लढवायची असल्यास त्यांनी लढवावी, असेही जय पवार म्हणाले.
