Baramati Assembly Byelection: CM Devendra Fadnavis urges political parties to keep Baramati election unopposed : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. यानंतर बारामती मतदारसंघातील त्यांची जागा रिक्त झाली असून येथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बारामतीतील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, तर उमेदवार उभा करण्याची काँग्रेसने तयारी दर्शविली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आतापर्यंत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काही पुणे जिल्ह्याच्या बाहेरील उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहेत.

या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की, ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केल्या आहेत. मला आठवतं की आर. आर. आबांचं निधन झालं होतं, त्याही वेळेस भाजपाने आम्ही पोटनिवडणुक लढणार नाही असं ठरवलं होतं आणि ती बिनविरोध केली होती”. सगळ्या पक्षांनी मन मोठं करून ही निवडणूक बिनविरोध केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

पोटनिवडणूक कधी होणार?

राज्यात दोन जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची समावेश आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच ४ मे रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल म्हणजेच मतमोजणी होणार आहे.

अजित पवारांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचेही काही दिवसांपूर्वी निधन झालं होते, त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती.