Baramati Bypoll Update: Rohit Pawar supports Sunetra Pawar’s candidacy with a sentimental message to voters : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आपण ही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार जाहीर केला आहे. यादरम्यान रोहित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करत भावनिक आवाहन केले आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी निवडणूक बिनविरोध झाली नाही तर सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असे आवाहन रोहित पवार यांनी बारामतीकरांना केले आहे.

रोहित पवारांची पोस्ट

रोहित पवारानी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत बारामतीकरांना आवाहन केले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो!” असे रोहित पवार म्हणाले आहेत. तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असेही रोहित पवारांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडून उमेदवार जाहीर

बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून ॲड.आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे जनसामान्यांशी असलेले दृढ नाते व सामाजिक बांधिलकी जोपासून निवडणुकीला सामोरे जातील हा मला विश्वास आहे, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

लक्ष्मण हाके निवडणूक लढवणार

ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी देखील निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. हाके यांच्या या घोषणेमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आता मावळली असल्याचे दिसून येत आहे.

यादरम्यान पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नाहीत असे मत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले.

राज्यातील राहुरी व बारामती विधानसभेची पोटनिवडणुक २३ एप्रिल रोजी होणार आहे. ह्या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा प्रयत्न महायुतीचे नेते करीत आहेत. महाविकास आघाडीत मात्र ही निवडणुकीबाबत दोन प्रवाह दिसत आहेत. काँग्रेस बारामती पोटनिवडणुक लढवत आहे. राहुरी आणि बारामती विधानसभेच्या जागा ह्या महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लढवलेल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही जागांबद्दल शरद पवार निर्णय घेतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.