मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनवि व्हावी यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले असून, स्वत: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीद्वारे उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून पाठिंब्यासाठी विनंती केली. काँग्रेस मात्र ही पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहे.
पवार कुटुंबीयांसोबत उद्धव ठाकरे यांचे स्नेहसंबंध असल्याने बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय ते लवकरच जाहीर करतील, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
पोटनिवडणुकीतील पाठिंब्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. याविषयीची माहिती ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. या दोघांमध्ये काय चर्चा झाली आणि त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणता निर्णय घेतला यासंदर्भात ते स्वत: माहिती देतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि अगदी जवळचे सहकारी होते. त्यांचे भावनिक नाते होते. त्यामुळे उद्धव ठाकरेच या पाठिंब्याबाबत निर्णय घेतील, असे सूचक भाष्य राऊत यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे.
काँग्रेस उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार
काँग्रेस हा देशातील मोठा पक्ष आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीचा मित्र पक्ष म्हणून काँग्रेस उद्धव ठाकरेंशी चर्चा करेल. आघाडी म्हणून एकमेकांशी चर्चा केल्यानंतरच त्यातून निर्णय बाहेर येईल, असे राऊत म्हणाले. परंतु, भाजपसोबत असलेल्या पक्षाला मदत होऊ नये, अशी काँग्रेसची भूमिका असू शकते, मात्र, यासंदर्भात चर्चा करून तोडगा काढू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सदस्याच्या निधनानंतर त्या मतदारसंघातील पोटनिवडणूक शक्य तो उमेदवार दिला जात नाही, अशी परंपरा आहे, या प्रश्नावर राऊत यांनी पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर तेथे अजित पवार यांच्या पक्षाने उमेदवार उभा केला होता. भाजपनेही अशा निवडणुका लढल्या असल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेस लढण्यावर ठाम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले असले तरी काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. उमेदवार निश्चित करून अर्ज भरला जाईल. या पोटनिवडणुकीसंदर्भातील भूमिका राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाही कळविण्यात आल्याचे सांगितले. सुनेत्रा पवार यांच्याकडून अद्यापपर्यंत काँग्रेसशी संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यांनी जर संपर्क साधला तर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याडून सांगण्यात आले.
