बारामती शहरातील म्हाडा वसाहत येथील ७५ वर्षीय करोनाबाधित रुग्ण बरा झालाय. त्याच्यावर पुणे शहरातील ससुन सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु होते. ससुन रुग्णालयातून या रुग्णाला गुरुवारी(दि ३०) डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बारामती शहर सध्या कोरोनामुक्त शहर झाले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोनामुक्त बारामतीचं सर्व श्रेय करोनाविरोधातील लढ्यात हातभार लावणाऱ्या प्रत्येकाला दिलं. “बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यामुळेच हे शक्य झालं” असं अजित पवार यांनी नमूद केलं. याशिवाय, अशाचप्रकारे महाराष्ट्रही लवकरच करोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “करोनामुक्त बारामतीचं सर्व श्रेय हे डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, नगर परिषद,सर्व नगरसेवक,ग्राम प्रशासन व पदाधिकारी यांना जातं. अनेक सामाजिक संस्थांनी देखील या लढाईत हातभार लावला. तमाम बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यानं हे शक्य झालं आहे. त्यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो! अशाच पद्धतीनं महाराष्ट्रसुद्धा लवकरच करोनामुक्त होईल, असा मला विश्वास आहे”,अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

बारामती शहर व तालुक्यात मिळून एकूण आठ करोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. त्यापैकी समर्थ नगर येथील एक आणि माळेगाव येथील एक अशा एकूण दोन रुग्णाचा मृत्यू झाला. तर, १६ एप्रिल रोजी करोनाची लागण झालेला पहिला रिक्षाचालक रुग्ण करोनामुक्त झाला. त्यानंतर २३ एप्रिल रोजी समर्थ नगर येथील एकाच कुटुंबातील चौघेजण कोरोना मुक्त झाले. या कुटुंबातील एक वर्षाच्या चिमुकलीनेही करोनावर मात केली. याशिवाय, काल(दि.३०) म्हाडा वसाहत येथील ७५ वर्षीय करोनाबाधित वृद्ध व्यक्तीलाही पुण्याच्या ससुन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सध्या बारामती शहर करोनामुक्त शहर झाले आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य पथकाने गुरुवारी (३० एप्रिल) पुन्हा बारामतीला भेट दिली. बारामती प्रशासनाकडून करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती केंद्रीय पथकाकडून घेण्यात आली.

बारामती प्रशासनाने केलेल्या उपाययोजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात आल्या आहेत, तसेच प्रशासनाचे नियोजन चांगले असल्याचे मत केंद्रीय आरोग्य पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी नोंदविले. पथकात डॉ. सागर बोरकर, डॉ. अंशू गुप्ता, डॉ.व्ही.एस. रंधवा यांचा समावेश होता. केंद्रीय आरोग्य पथकाने चार दिवसांपूर्वी बारामतीस भेट दिली होती. त्यानंतर अचानक केंद्रीय पथकाने भेट दिल्याने धावपळ उडाली.  या पथकाने देसाई इस्टेट भागाची पाहणी केली तसेच तेथील स्वयंसेवकांबरोबर चर्चा केली. बारामती पॅटर्ननुसार नागारिकांना भाजीपाला, किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचविल्या जात आहेत, याचे कौतुक केंद्रीय पथकाने केले.त्यानंतर बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात पथकाने भेट देऊन तेथील कामकाजाची पुन्हा माहिती घेतली.