२८ जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. दरम्यान बारामती येथील जागा अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. या महिन्यात बारामतीची पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. पण महाविकास आघाडी याबाबत काय तो निर्णय घेईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली आहे पण…

बारामतीची जागा आम्ही लढलो नव्हतो, शरद पवारांचा पक्ष ती जागा लढला होता. त्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली आहे. तसंच राहुरीची जागा लढण्यासाठी आमच्याकडे तीन इच्छुक उमेदवार आहेत. बारामतीची पोटनिवडणूक आहे त्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. चर्चा होत असतात. त्यांची युती भाजपासह आहे. त्या काही महाविकास आघाडीच्या उमेदवार नाहीत. अशावेळी त्यांनी जरी चर्चा केली असली तरीही उद्धव ठाकरे काय तो निर्णय घेतील. बारामतीबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी बारामतीसंदर्भात निर्णय दिलेला नाही-राऊत

शिवसेना पक्षप्रमुखांनी बारामती संदर्भात निर्णय दिलेला नाही. भारतीय जनता पक्षाबाबत महाविकास आघाडीची एक भूमिका आहे. तरीही अजित पवारांना काळाने हिरावून नेल्याने एक प्रकारची सहानुभूती आहे हे देखील आम्हाला ठाऊक आहे. पण निवडणूक लढायची नाही, बिनविरोधच निवडणूक झाली पाहिजे हा अट्टाहास चुकीचा आहे. यशवंतराव चव्हाण यांनाही निवडणुकीला सामोरं जावं लागलं होतं. भाजपाचे लोक इतर निवडणुका लढतातच ना? आमदार फोडतात, खासदार फोडतात. ज्यांना सरकार विरोधात मत द्यायचं आहे अशा वर्गावर बिनविरोध निवडणूक हा अन्याय आहे. महाविकास आघाडीमध्ये राहुरी आणि बारामती निवडणुकांबाबत चर्चा सुरु आहे, चर्चा सुरु राहतील आणि निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एकसंध आहे आणि राहिल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आमचे तीन उमेदवार इच्छुक आहेत, आम्हीही तयारी केली आहे-राऊत

हर्षवर्धन सपकाळांनी त्यांचे उमेदवार ठरवले असतील तर चांगली गोष्ट आहे. आम्हीही तयारी सुरु केली आहे. आमचेही तीन उमेदवार इच्छुक आहेत. आम्ही चर्चा करु आणि काय तो निर्णय घेऊ असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.अजित पवार हे राज्याचे आदरणीय नेते होते. त्यांचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला, त्यामुळे महाराष्ट्राला धक्का बसला आणि त्यातून महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे तीन पक्षांची चर्चा होईल. बिनविरोध निवडणूक करण्याचा आग्रह आम्हाला मान्य नाही. महाविकास आघाडी काय तो योग्य निर्णय घेईल असं संजय राऊत म्हणाले.