केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या रिक्त जागांवर पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झालेली आहे. तर, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झालं. यामुळं बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २३ एप्रिलला ही पोटनिवडणूक पार पडणार आहे. सुनेत्रा पवार निवडणूक लढवतील अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली.

सुनील तटकरे यांनी काय सांगितलं?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारच बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची माहिती आहे. २३ एप्रिलला ही पोटनिवडणूक पार पडणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं?

बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकांची घोषणा झाली तर दोन्ही निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असेल. पण आमच्यावर जर निवडणूक लादली गेली तर आम्हीही निवडणूक लढायला तयार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे इथली पोटनिवडणूक आता २३ एप्रिलला पार पडणार आहे.

बारामतीची पोटनिवडणूक २३ एप्रिलला

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. तसेच ४ मे रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल म्हणजेच मतमोजणी होणार आहे. ३० मार्च २०२६ रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल?

निवडणुकीसाठीची अधिसूचना : ३० मार्च २०२६
उमेदवारी अर्ज दाखल : ६ एप्रिल २०२६
अर्ज छाननी : ७ एप्रिल २०२६
अर्ज मागे घेण्याची तारीख : ९ एप्रिल २०२६
मतदान : २३ एप्रिल २०२६
मतमोजणी : ४ मे २०२६

अजित पवारांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं, त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.