Baramati By-Election Vote Counting Updates : राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी एका विमान अपघातात आकस्मिक निधन झाल्याने बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीसाठी महायुतीने अजित पवारांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर अपेक्षेप्रमाणे बारामती विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षाचा एकही उमेदवार उतरलेला नाही. मताधिक्याचा विक्रम करण्यासाठी महायुतीने प्रचार केला असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही महायुतीच्या उमेदवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्यामुळे बारामतीतील तीन लाख ७३ हजार मतदार इतिहास घडविणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडीत काढला आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २ लाख १४ हजार ९३ मताधिक्याने विजयी साकारला. त्यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात असलेल्या २२ उमेदवार आणि ‘नोटा’ यांना ४८३७ मतांवर समाधान मानावे लागले. बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेला मताधिक्याचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडला. बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. त्यांनी २०१९ मध्ये भाजपाचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. यानंतर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील मुख्य राजकीय पक्षांचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार या किती मताधिक्याने विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक निकालासंबंधीत सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत…
Baramati By-Election Results 2026 Sunetra Pawar : वाचा बारामती पोटनिवडणुकीच्या सर्व महत्त्वाच्या ताज्या अपडेट्स...
"निवडणुका येतात आणि जातात, पण...", बारामतीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवारांची पोस्ट
"बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल तमाम मायबाप बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार.आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे.
आदरणीय अजितदादांच्या पश्चात झालेली बारामतीची ही पहिलीच निवडणूक होती.त्यांच्या मार्गदर्शनाची आणि त्यांच्या उपस्थितीची उणीव आज प्रकर्षाने जाणवते; हा विजय माझ्यासाठी केवळ राजकीय यश नसून, आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे. अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आणि बारामतीसाठी केलेले कार्य, त्यांची जनतेशी असलेली नाळ आणि विकासाची त्यांची दृष्टी आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यांचे विचार आणि संस्कारच मला पुढे जाण्याची ताकद देत आहेत. हा विजय म्हणजे त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार..!
तुमच्या अथक परिश्रमामुळेच हा विजय शक्य झाला आहे. तसेच या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, पाठिंबा दिलेले इतर सर्व मित्र पक्ष, विविध संस्था, संघटना यांचे मी मनःपूर्वक आभार मानते.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा जपत, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा माझा निर्धार कायम राहील.तरुणाई, शेतकरी, महिला, उद्योजक आणि समाजातील सर्वच घटकांना केंद्रस्थानी ठेवून बारामतीच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया.
निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया. बारामतीकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही कमी पडू देणार नाही. आपल्या सर्वांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभी राहीन, अशी मी आपणांस खात्री देते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, बारामतीच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन," अशी पोस्ट सुनेत्रा पवार यांनी केली आहे.
Baramati By-Election Result 2026: अजित पवारांचा विक्रम अखेर मोडला; बारामतीत सुनेत्रा पवार तब्बल २ लाख १४ हजार मताधिक्याने विजयी
सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक; म्हणाले, "स्वर्गीय अजितदादा पवार यांनी..."
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक मताधिक्याने विजय झाला आहे. या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "दोन लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे हार्दिक अभिनंदन. बारामतीकरांनी सुनेत्राताईंना विक्रमी मताधिक्याने विजयी करत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीच्या विकासाचे आणि प्रगतीचे पाहिलेले स्वप्न सुनेत्राताई पूर्ण करतील, यात शंका नाही," अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
२.१४ लाखांचा विक्रम इतिहासजमा! सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय झाल्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. "देशातील आजवरच्या २.१४ लाख मताधिक्याचा विक्रम मोडीत काढून २.१८ लाख एवढ्या विक्रमी मताधिक्याने बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल सुनेत्राकाकींचं मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय म्हणजे अपेक्षेप्रमाणे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं अजितदादांवरील प्रेम आणि त्यांना कृतज्ञतेने वाहिलेली आदरांजली आहे..! या विराट विजयाबद्दल समस्त बारामतीकर मतदारांचेही मनापासून आभार!" असे रोहित पवार म्हणाले आहेत.
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार २,१४,०९३ मताधिक्याने विजयी
बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार २,१४,०९३ मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांना २,१८,९३० मते मिळाले असून अन्य उमेदवारांना ४८३७ मते मिळाले आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विक्रम मोडला
Baramati By-Election Results : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांची घोडदौड सुरूच; दहाव्या फेरीअखेर ८७ हजारांहून अधिक मते!
बारामती पोटनिवडणुकीत दहाव्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ८७८२८ मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला आतापर्यंत २९९ मते, तर तिसऱ्या क्रमांकावर 'नोटा' आहे. आत्तापर्यंत 'नोटा'ला २९३ मते मिळाली आहेत.
"दादांनंतरची ही पहिली निवडणूक आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा प्रकारच्या निवडणुकीला सामोरे जावे लागेल. मन खरंतर खूप भरून येत आहे. पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवला आहे, प्रत्येक बारामतीकराने दादांनी केलेल्या विकासकामांचे प्रतिक म्हणून आज त्यांना भावांजली वाहिली आहे, असे मी म्हणेन. मतदान हे त्यांनी दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजवर केलेली सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दाखवून दिले आहे," असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
बारामती पोटनिवडणुकीत आठव्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ७८६२८ मते. मतमोजणीच्या अद्याप २४ फेऱ्या होणार आहेत.
बारामती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची नववी फेरी सुरू असताना अद्याप सुनेत्रा पवारांना ७८२४४ मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधातील इतर उमेदवार शर्यतीत कुठेच नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला २८४ मते तर नोटाला २५१ मते मिळाली आहेत.
बारामती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या आठव्या फेरअखेरची आकडेवारीही समोर आली असून, आठ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ७०६४२ मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे त्यांच्या जवळपासही दिसून येत नाहीयेत. या फेरीअखेर करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले यांना प्रत्येकी ८५ मते मिळाली आहेत.
सध्या सुनेत्रा पवार या ६९३६७ मताधिक्याने आघाडीवर आहेत. २२ उमेदवार आणि 'नोटा' यांना मिळालेली आतापर्यंतची एकूण मते १२७५ इतकी आहेत.
Baramati By-Election Result 2026 : मताधिक्याचा नवा उच्चांक गाठणार? सात फेऱ्यांनंतरही बारामतीत सुनेत्रा पवारांचे एकतर्फी वर्चस्व
बारामती पोटनिवडणुकीत सातव्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ६१९१७ मते मिळाली आहेत. याबरोबरच सुनेत्रा पवारांची एका विक्रमी मताधिक्याकडे घौडदौड सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
सातव्या फेरीअखेर न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आर. वाय. घुटुकडे यांना २५६ मते मिळाली आहेत. हिंदुस्तान जनता पार्टीचे उमेदवार सतीश कदम यांना ५० मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार करुणा मुंडे यांना ७७ तर अभिजीत बिचुकले यांना ७६ मते मिळाली आहेत.
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात", सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्या म्हणाल्य, "आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!"
Baramati Election Resul : सुनेत्रा पवार यांनी ओलांडला १ लाख मतांचा टप्पा
-बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख ३ हजार ७०९ मतांची आघाडी
-बाराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ८०५७ मतं
-बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित
-एकूण २३ फेऱ्यांपैकी १२ फेऱ्यांचे निकाल आले समोर
-दुपारी २.३० पर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता
Baramati Bypoll Election Results 2026 Live Updates : करुणा मुंडे आणि बिचुकलेंची मतांची 'शंभरी' गाठण्यासाठीही कसरत; बारामतीचा कौल केवळ सुनेत्रा पवारांनाच
बारामती पोटनिवडणुकीत सहाव्या फेरी अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ५३४७८ मते मिळाली आहेत. तर न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे आर. वाय घुटुकडे यांना २२८ मते, हिंदुस्तान जनता पार्टीचे सतिश कदम यांना ४७ तर करुणा मुंडे यांना ६८, अभिजीत बिचुकले यांना ६५ मते मिळाली आहेत.
Baramati Byelection Results Sunetra Pawar Post: पाचव्या फेरीअखेर सुनेत्रा पवारांनी गाठला ४४ हजार मतांचा टप्पा
बारामती पोटनिवडणुकीत पाचव्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ४४७९६ मते मिळाली आहेत.
Baramati Byelection Results Sunetra Pawar Post: "कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये"; सुनेत्रा पवारांचे बारामतीत मतमोजणी सुरू असताना भावनिक आवाहन
बारामती पोटनिवडणूक निकालात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभ्या असलेल्या २२ उमेदवारांची एकूण मते अवघी ३८९ इतकी आहेत. तर 'नोटा'ला ८८ मते पडली आहेत. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना १८ मते मिळाली आहेत.
Baramati Election Result : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांची निर्णायक आघाडी!
बारामती पोटनिवडणुकीत तिसऱ्या फेरीअखेर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना २६७७३ मते मिळाली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांची निर्णायक आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
बारामती पोटनिवडणुकीत करुणा मुंडे यांच्या पदरात निराश पडली आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना दुसऱ्या फेरी अखेर अवघी १८ मते मिळाली आहेत. यामुळे बारामतीत त्यांचं डिपॉझिट जप्त होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
राहुरी पोटनिवडणुकीत सध्या भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले हे आघाडीवर आहेत... या पोटनिवडणूक निकालाच्या सर्व अपडेट्स येथे वाचा एका क्लिकवर...
बारामती पोटनिवडणुकीच्या तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे युवा नेते जय पवार मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत.
बारामतीत सुनेत्रा पवारांचे वर्चस्व! दुसऱ्या फेरीतही आघाडी कायम; विक्रमी मताधिक्याकडे वाटचाल?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. काही वेळापूर्वी स्ट्राँग रूम उघडण्यात आली असून, या स्ट्राँग रूममधून आता २० ईव्हीएम मतपेट्या मोजणीसाठी घेण्यात आल्या आहेत. दरम्यान मतमोजणीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुसऱ्या फेरीअखेर १६५४३ मतांनी आघाडीवर आहेत.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. काही वेळापूर्वी स्ट्राँग रूम उघडण्यात आली असून, या स्ट्राँग रूममधून आता २० ईव्हीएम मतपेट्या मोजणीसाठी घेण्यात आल्या आहेत. दरम्यान मतमोजणीमध्ये दुसऱ्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार १६५४३ मतांनी आघाडीवर आहेत.
Baramati By-election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोडणार अजित पवारांचा विक्रम?
बारामती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून लवकरच निकाल सर्वांसमोर येणार आहे. या पार्श्वभूमीवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मताधिक्याचा विक्रम सुनेत्रा पवार मोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.... वाचा सविस्तर वृत्त
Baramati By-Election Results 2026: बारामती पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ६५०० मतांनी आघाडीवर
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. टपाली मतदान आणि मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली असून पहिल्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ६५०० मतांची आघाडी घेतली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असलेल्या बारामती एमआयडीसी वेअरहाऊस कॉर्पोरेशनबाहेरची दृश्ये-
बारामती पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. त्यानुसार पोस्टल मतांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतल्याची माहिती मिळत आहे.
बारामती पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कसा होता?
अजित पवारांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली होती, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं, त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली होती.
निवडणुकीसाठीची अधिसूचना : ३० मार्च २०२६
उमेदवारी अर्ज दाखल : ६ एप्रिल २०२६
अर्ज छाननी : ७ एप्रिल २०२६
अर्ज मागे घेण्याची तारीख : ९ एप्रिल २०२६
मतदान : २३ एप्रिल २०२६
मतमोजणी : ४ मे २०२६

बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६ निकाल
