Parth Pawar News: Amol Mitkari slams Congress over comments on Parth Pawar’s speaking skills and family background : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र, काँग्रेसने या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आपला उमेदवार दिला आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. “महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे,” असे पार्थ पवार म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पार्थ पवारांच्या विधानाचे समर्थन केले आहे.
अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये ते पार्थदादा तुम्ही एकदम बरोबर आहात असे मिटकरी म्हणाले आहेत. “आमच्या पक्षाचे नेते खासदार पार्थदादा पवार यांचं वक्तव्य काँग्रेसला फारच झोंबलेलं दिसतंय. काँग्रेसचा ‘डाऊनफॉल’ सुरू असल्याच्या पार्थदादांच्या वक्तव्यावर एरव्ही डबक्यात लपून बसलेली बेडकं बाहेर पडत एकदम ‘डऱ्याव-डऱ्याव’ करत बोंबलायला लागलीत. कधीकाळी राज्यात सत्ताधारी असलेली काँग्रेस आज विधानसभेत १६ च्या आकड्यावर थांबलीय. १६ हा आकडा नेहमीच धोक्याचा असतो, असं जाणकारांना माहित आहे. त्यामुळेच पार्थ दादांनी असं वक्तव्य केलेलं असावं,” असे मिटकरी म्हणाले आहेत.
अमोल मिटकरी यांनी काँग्रेसला अस्तित्व गमावलेला पक्ष म्हणत पार्थ पवारांच्या विधानाचे समर्थन केले आहे. “आपलं वर्तमान आणि अस्तित्व गमावलेल्या अन् विसरलेल्या काँग्रेसला आता इतिहासाचाही अभ्यास करावा लागेल हे नक्कीच. पार्थदादा!, तुम्ही अगदी खरं बोललेत. काँग्रेसचा ‘डाऊन फॉल’च सुरू आहे,” असे मिटकरी म्हणाले.
काँग्रेसची पार्थ पवारांवर टीका
महाराष्ट्र काँग्रेसच्या एक्स अकाउंटवरून पार्थ पवारांवर टीका करण्यात आली होती. “धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील.
या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे?”
पार्थ पवार काय म्हणाले होते?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्याच्या संदर्भात बोलताना खासदार पार्थ पवार म्हणाले होते की, “माझं कोणाशीही बोलणं झालं नाही. पण त्यांनाच कळायला पाहिजे काय-करायचं काय नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची गरज मला नाही वाटत. कारण सर्वांना माहिती आहे ते काय करत आहेत? सगळे मोठे लोक आहेत, त्यामुळे काय चाललंय हे सर्वांना समजतं. त्यांनी जो विचार केला असेल तो विचार त्यांना करूद्या.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “त्यांना (काँग्रेसला) नंतर महाराष्ट्रात काय त्रास होणार हे त्यांना दिसेल. कारण असं आहे की लोक विसरत नाहीत. अजितदादा यांच्याबाबत लोकांच्या मनात प्रेम आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या पक्षाने असा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाहीत. त्यामुळे जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागत असतं. आम्ही देखील त्या पद्धतीने समोरं जाऊ. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काय नशिबात असेल ते होईल. पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे.”
