मुंबई : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काही गैर वाटत नाही. काँग्रेसची भूमिका लोकशाही पद्धतीची आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे.
बारामतीच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे खासदार पार्थ पवार यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे, अशी टिका केली होती. त्यावरून सुळे यांनी पार्थ पवार यांच्या विधानापासून फारकत घेत काँगेसने काहीही गैर केले नाही, असे म्हटले आहे.
कोणताही राजकीय पक्ष संविधानाच्या चौकटीत काम करत असतो. आपण लोकशाहीवर प्रेम करणारे लोकं आहोत. आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्ष जवळून पाहिला आहे. काँग्रेसच्या मतांवर निवडून आलो आहोत. काँग्रेसचे देशासाठीचे योगदान कोणीही विसरु शकत नाही, असेही सुळे यांनी म्हटले आहे.
माझ्यासाठी बारामती ही एक अतिशय भावनिक गोष्ट आहे. आज पवार कुटुंबाची जी ओळख आहे. सहा दशकं पवार नाव हे महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात आणि देशाच्या राजकारणात आहे. हे फक्त आणि फक्त बारामती आणि महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेमुळे, असेही सुळे म्हणाल्या.
कुठलाही पक्ष तसा संपत नसतो : रोहित पवार तुम्ही सत्तेत असला किंवा विरोधात असला, तुम्हाला जमिनीवर राहणे महत्त्वाचे आहे. पार्थ पवार यांनी जे विधान केले, ते योग्य नव्हते. कुठे ना कुठे घाईगडबड झाली आहे. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो. सर्व पक्ष आपआपल्या पातळीवर ताकद लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल बोलताना, तो पक्ष संपला म्हणणे योग्य नव्हते, अशा शब्दात रोहित पवार यांनीही पार्थ पवार यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे.
