पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये पुन्हा एकदा एका शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान बारामतीच्या एअरफील्डवर प्रशिक्षण सत्रादरम्यान धावपट्टीवरून वळण घेत असताना घसरल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रशिक्षणाच्या सरावादरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

या विमानाला काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर हे विमान धावपट्टीवरून घसरल्याचं सांगितलं जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, अपघातावेळी विमानात दोघेजण होते. मात्र, यात कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी काय माहिती दिली?

“बारामती विमानतळावर प्रशिक्षणादरम्यान एक शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली आहे. या विमानात कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे आणि अभिजित जुंद्रे हे होते. यात कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे”, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिली आहे.

दरम्यान, बारामती विमानतळ परिसरात शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची घटना घडल्याची माहिती समजताच तात्काळ विमानतळ प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस व आपत्कालीन यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच विमानातील पायलट देखील सुरक्षित असल्याची माहिती सांगितली जात आहे.

बारामतीत याआधीही प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं होतं

याआधी १३ मे २०२६ रोजी प्रशिक्षण सत्रादरम्यान रेडबर्ड कंपनीचे एक प्रशिक्षणार्थी विमान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोसळलं होतं. विमान हवेत असतानाच समस्या निर्माण झाली होती आणि त्यानंतर हे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं होतं. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नव्हती. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मोठी गर्दी केली होती. पोलीस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केलं होतं. या घटनेला कारणीभूत ठरलेल्या तांत्रिक बिघाडाचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न त्यानंतर करण्यात येत होता. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचं तेव्हा सांगण्यात आलं होतं.