सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. बार्शी येथे आयोजित एका उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरामध्ये खेळपट्टी तयार करताना जड रोलरखाली चिरडून एका १५ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ३० मे रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी दोन क्रिकेट प्रशिक्षक आणि संबंधित क्रिकेट असोसिएशनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे क्रीडा जगतात आणि पालकांमध्ये प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
नक्की काय घडलं?
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ३० मे रोजी सकाळी सरावाचे सत्र सुरू होण्यापूर्वी खेळपट्टी तयार करण्याचे काम सुरू होते. नेहमीप्रमाणे मैदानावर खेळपट्टी सपाट करण्यासाठी जड रोलर फिरवला जात होता. प्रशिक्षकांच्या सांगण्यावरून हा मुलगा इतर मुलांसोबत मिळून तो अवजड रोलर ओढत होता. मात्र, अचानक तोल गेल्याने आरव त्या जड रोलरच्या खाली आला. रोलरचे वजन जास्त असल्याने तो गंभीररीत्या चिरडला गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
प्रशिक्षकांचा निष्काळजीपणा; घटनास्थळी कोणीच नव्हतं
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लहान मुलांकडून एवढे मोठे आणि जोखमीचे काम करून घेतले जात असताना घटनास्थळी एकही प्रौढ व्यक्ती किंवा पर्यवेक्षक उपस्थित नव्हता. “मुले कोणत्याही सुरक्षेविना आणि मार्गदर्शनाशिवाय तो जड रोलर ओढत होती. इतक्या लहान मुलांकडून असं धोकादायक काम करून घेताना तिथे सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली गेली नव्हती,” अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
दोन प्रशिक्षकांसह क्रिकेट असोसिएशनवर गुन्हा दाखल
या घटनेची गंभीर दखल घेत बार्शी शहर पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर मोठी कारवाई केली आहे. मुलांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही क्रिकेट प्रशिक्षक आणि संबंधित क्रिकेट असोसिएशनविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलांना योग्य ती सुरक्षा न पुरवणे आणि त्यांच्याकडून धोकादायक काम करून घेणे या निष्काळजीपणामुळेच आरवचा जीव गेल्याचे सकृतदर्शनी समोर आले आहे.
चौकशी सुरू, पालकांकडून कारवाईची मागणी
या दुर्दैवी घटनेनंतर क्रीडा शिबिरांमध्ये मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लाखो रुपये फी घेऊन चालवल्या जाणाऱ्या अशा कॅम्पमध्ये मुलांच्या जीवाशी खेळ का केला जातो? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. बार्शी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आरवच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
