अलिबाग- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी आपल्या पदाचा त़डकाफडकी राजिनामा दिला. होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनिश कामत यांच्याकडे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. राज्यपालांनी कुलगुरू काळे यांना राजिनामा देण्यास का सांगितले हे स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडून २५ मार्च २०२६ रोजी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले होते. राज्यपालांच्या आदेश प्राप्त होताच, डॉ. काळे यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला आणि पदभार होमी भाभा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्याकडे सोपविला. या छोटेखानी कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी माजी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान राज्यपालांच्या आदेशामुळे लोणेरे विद्यापीठात खळबळ उडाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरूनही डॉ. काळे यांचे नाव तातडीने हटविण्यात आले आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने कुठलीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली आहे.
