वध्र्यात अस्वलांचे अभयारण्य?

परिसरातील गावकरी भयभीत होणे नेहमीचेच झालेले आहे.

मनुष्यवस्तीवरील वारंवार होणाऱ्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर अस्वलांची राजधानी ठरलेल्या वर्धा जिल्ह्य़ातील कारंजा-आष्टी वन्यपरिसरास अस्वलांचे ‘अभयारण्य’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

विदर्भात सर्वाधिक अस्वल वर्धा जिल्ह्य़ातील डोंगरकपारीचा भाग असणाऱ्या कारंजा-आष्टी-सेलू परिसरात निवासी असल्याचे वनाधिकाऱ्यांचे मत आहे. खरांगणा भागात तर अस्वलांचा वावर शहरी वस्त्यांपर्यंत वाढला. कारंजा परिसरातील जंगलात गत वर्षभरात अस्वलांनी १८ वेळा हल्ला केल्याची नोंद आहे. परिसरातील गावकरी भयभीत होणे नेहमीचेच झालेले आहे. १५ दिवसांपूर्वी तर अस्वलांचा वावर गावकऱ्यांना जखमी करण्यापर्यंत वाढल्याने वनविभागाला आठवडाभर पिंजरे लावून निगराणी करावी लागली. यावर पर्याय काय, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. वन्यजीव संवर्धन कायद्याच्या परिशिष्ट एक अंतर्गत अस्वलाचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय वन्यजीव संघटनेने संभाव्य संकटग्रस्त म्हणून घोषित केलेल्या अस्वलांवर चोरटय़ा शिकारीमुळे गंडांतर आले आहे. महाराष्ट्रात ७०० ते ८००च्या संख्येत अस्वलांची संख्या आहे. त्यामुळे मानवी वस्तीच्या संरक्षणासोबतच अस्वलांची काळजी घेणे अपरिहार्य ठरले आहे. अस्वल माणसांपासून दूरच असतो. दिवसभर कडेकपारीत राहणारे अस्वले सायंकाळी खाद्याच्या शोधात फि रतात. त्यांच्या वाटेत येणाऱ्यांवरच अस्वल हल्ला करतात. मोठाली नखे व दात याद्वारे झालेल्या हल्ल्यात मनुष्य गंभीर जखमी होतो. कारंजा परिसरात अस्वलांना अनुकूल स्थिती आहे. डोंगरदऱ्या, कडेकपारी, भरपूर हिरवळ, नैसर्गिक पाणवठे व मोहाफु लांची झाडे, अशा स्थितीत अस्वलांचा वावर वाढला. फ लाहारी असणाऱ्या अस्वलांचे मध हे सर्वात प्रिय खाद्य आहे. या परिसरातील मधमाशांचे मोठय़ा प्रमाणात असणारे पोळे हे आकर्षण ठरते. वाघ, साप, मधमाशीचे भय अस्वलास नाही. झाडावर चढून ते पोळ पाडतात. अंगावरील केसांच्या आवरणामुळे त्याला कसलेच भय नाही. गुरेचराई, तेंदूपत्ता संकलन, शिकार व अन्य कारणास्तव जंगलात फिरणाऱ्यांवर अस्वल हल्ला करतात.

नागपूर जिल्ह्य़ातील वन्यपरिसरातील अस्वल याच कारणास्तव कारंजा परिसरात स्थलांतरित झाल्याने त्यांची संख्या ५० ते ६० घरात पोहोचली आहे. अस्वल-मानव संघर्ष टाळून अस्वलांची निगराणी करण्याच्या हेतूने अस्वलांचे अभयारण्य घोषित करण्याचा प्रस्ताव बळावत आहे. या जंगल परिसरात मनुष्याचा वावर कमीच आहे. टायगर प्रोजेक्टअंतर्गत शेतीचाही समावेश होतो. त्यामुळे त्या प्रकल्पांचे विभाजन करावे लागते. अस्वलांचा निवास असणारे क्षेत्र तसे नाही. अभयारण्य घोषित झाल्यास पर्यटनस्थळ म्हणून विकास होऊ शकतो. मानवी वस्तीवरचे हल्ले कमी होतील.

व्यवस्थापनात सुसूत्रता राहील. गुजरात शासनाने मानवी वस्ती सुरक्षित करण्यासाठीच अभयारण्य घोषित केल्याचे निदर्शनास आणले जाते. अस्वलांची वाढती संख्या म्हणजे हा वन्यपरिसर त्यांच्यासाठी अत्यंत आरोग्यदायी असल्याचे म्हटले जाते.

३० किलोमीटर क्षेत्राचे अभयारण्य शक्य

अस्वलांसाठी हे क्षेत्र राखीव करणे व पर्यटनास चालना देण्याच्या हेतूने अभयारण्य करणे योग्य आहे. गुजरात शासनाने बनासकांठा व राजमहल भालू अभयारण्य घोषित केले आहे. कारंजाच्या ३० किलोमीटरचे क्षेत्र अभयारण्य होऊ शकते.

कौशल्य मिश्र, वन्यजीव अभ्यासक.

 

अस्वलांना बंदिस्त करणे अशक्य

वाघांमुळे बफ र झोन वाढलेलेच आहे. त्यामुळे अभयारण्यचा विचार अद्याप ठोस स्वरूपात झालेला नाही. मानवी वस्त्यांवरील होणारे हल्ले रोखण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. विशेष पोलीस पथकाद्वारे परिसरात निगराणी ठेवण्यात आली होती. या अभयारण्य प्रदेशात ५० फू ट लांबवर कपारी आहेत. त्यामुळे अस्वलांना बंदिस्त करणे शक्य नाही.

अनिल चव्हाण, जिल्हा वनाधिकारी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bear sanctuary in wardha