युवतीसह सातजण गंभीर जखमी, ६जणांना कोठडी

युवतीची छेड का काढली? असा जाब विचारणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडी मंडळीला गोजेगावातील काहींनी बेदम मारहाण केली. या प्रकारात युवतीसह सातजण गंभीर जखमी झाले. यातील पाचजणांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

युवतीची छेड का काढली? असा जाब विचारणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडी मंडळीला गोजेगावातील काहींनी बेदम मारहाण केली. या प्रकारात युवतीसह सातजण गंभीर जखमी झाले. यातील पाचजणांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. औंढा पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. त्यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
प्रियंका चंद्रकांत नरवाडे यांच्या तक्रारीवरून १६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे रविवारी लग्नसोहळ्यात हा प्रकार घडला. मुंबई, औरंगाबाद, कल्याण, जालना येथून वरपक्षाची मंडळी लग्नसोहळ्यास आली होती. गावातील काही युवकांनी वऱ्हाडातील युवतीची छेड काढली. हा प्रकार समजताच वऱ्हाडी मंडळींनी छेड काढणाऱ्या युवकांना जाब विचारला. मात्र, गावातील काही युवकांनी थेट वऱ्हाडातील मंडळीला मारहाण सुरू केली.
मारहाणीत विद्या नरवाडे व गौतम पंडित हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेड रुग्णालयात हलविण्यात आले. वैभव नरवाडे, गौतम फुलारे, प्रियंका नरवाडे, अनुराग पाटील, ज्ञानेश्वर नरवाडे व प्रशांत सपकाळ या जखमींना औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने पाचजणांना परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, उपअधीक्षक निलेश मोरे यांनी घटनास्थळास भेट दिली. गावात शांतता समितीची बठक घेत आरोपींना अटक करण्याची ग्वाही देत शांतता राखण्याचे आवाहन केले. जगन उत्तम नागरे, ज्ञानेश्वर उद्धव नागरे, राजू भगवान जायभाये, विनोद बबन गुठ्ठे, सुभाष पंडितराव जायभाये, सीताराम बाबुराव नागरे यांना अटक करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Beating to marriage party by molest

ताज्या बातम्या