सांगली : अडीच कोटींच्या कर्जापोटी साडेपाच कोटींची परतफेड होऊनही आठ कोटींच्या वसुलीसाठी मारहाण करून धमकावल्या प्रकरणी मिरजेतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रफिक पटेल यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. खासगी सावकारी प्रकरणी पाच सावकारासह सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल होताच ही कारवाई करण्यात आली.

मिरजेतील सराफ व्यावसायिक राहिल शेख यांनी मिरजेतील बांधकाम व्यावसायिक रफिक पटेल, मुलगा जहूर पटेल, अजमल पटेल, मन्सूर मुल्ला, अभिजित ताशिलदार या पाच खासगी सावकारांकडून मासिक दहा टक्के व्याजदराने २ कोटी ८२ लाख ७५ हजार रुपये व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीपोटी व्याज, दंडव्याज व मुद्दल पोटी आतापर्यंत ५ कोटी २४ लाख ४० हजार रुपये बँक खात्याद्वारे परत केले आहेत. तरीही अद्याप आठ कोटींची मागणी केली जात असून या वसुलीसाठी शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे. आठ कोटींच्या वसुलीसाठी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. किल्ला भागातील दुकानगाळय़ाचा बळजबरीने कब्जा घेतला असून दिवाकर पोतदार हे समाज माध्यमावर संदेश पाठवून बदनामी करीत असल्याची तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित पटेल याला अटक करण्यात आल्याची माहिती सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली.