रस्त्याचे काम व निधी मंजूर होऊन सुद्धा रस्त्याचे काम रखडल्याने वाई पंचायत समितीच्या माजी सदस्याने आक्रमक पवित्रा घेत, जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अधिकाऱ्याची खुर्चीच काढून घेतली.

बावधन शिवारातील कणूर (ता वाई) गावातील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे मागील दीड वर्षांपूर्वी टेंडर मंजूर झले होते. अंदाजे २ लाख ३० हजार रुपयांचे काँक्रिटीकरणाचे काम होते. निधी मंजूर होऊन व वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ठेकेदाराला कामाचे आदेश (वर्क ऑर्डर) न दिल्याने मंजूर रस्ता दीड वर्षानंतरही पूर्ण होत नसल्याने संतापलेल्या पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक ननावरे, बावधन यांनी आक्रमक पवित्रा घेत वाई पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची खुर्चीच काढून घेतली.

त्या कर्तव्याचे पालन कराल तेव्हाच खुर्ची परत देऊ –

कामे न करता अधिकारी फक्त खुर्चीवर बसून राहत असल्याने तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असे सांगत त्यांची खुर्ची काढून घेतली. खुर्चीचा वापर करून कोणतीही विकास कामे केली जात नाहीत, मग त्यांचा उपयोग काय असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. या कामाची आदेश न मिळाल्याने दीपक ननावरे यांनी शाखा अभियंता एस. व्ही. शिंदे आणि कनिष्ठ अभियंता कुणाल दीक्षित यांची खुर्चीच उचलून वाहनात भरून नेली आहे. जोपर्यंत लोकांची कामे तुमच्या मार्फत पूर्ण केली जाणार नाहीत तोपर्यंत, ही खुर्ची तुम्हाला दिली जाणार नाही. ही खुर्ची म्हणजे एक प्रकारची जबाबदारी, कर्तव्य आहे त्या कर्तव्याचे पालन कराल तेव्हाच खुर्ची परत देऊ असा पवित्रा ननावरे यांनी घेतला आहे.

टेंडरची रक्कम वाढीव निघाल्याने त्या कामास दुबार मंजुरी घ्यावी लागली –

मात्र या सर्व प्रकरणावर वाई पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.टी.जाधव यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे, कणूर (ता. वाई) येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाला मंजुरी दीड वर्षांपूर्वीच दिली आहे. परंतु सुरुवातीला त्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजुरी देण्यात आली होती. रस्त्यात दलदल असल्याने वर्क ऑर्डर बदलावी लागली. टेंडरची रक्कम वाढीव निघाल्याने त्या कामास दुबार मंजुरी घ्यावी लागली. ती देखील मंजुरी आली असून थोड्याच दिवसांत ते काम योग्य पद्धतीने चालू करण्यात येणार आहे. दीपक ननावरे यांचा या प्रकरणात काहीतरी गैरसमज झालेला दिसत आहे. बांधकाम विभागाकडून त्या कामासंबधी कोणतीही चालढकल करण्यात आलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.