पुण्यात डीजे बंदीची मागणी जोर धरु लागली आहे. विद्यानंद बापट यांनी या विरोधात आवाज उठवला, त्यामुळे ते चर्चेत आलेच. शिवाय रविवारी पुण्यात विद्यानंद बापट यांना पाठिंबा देण्यासाठी पुणेकरांनी आंदोलनही केलं. दरम्यान वर्षा कदम नावाच्या पुणेकर महिलेने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना डीजेमुळे लहान मुलाला कसा त्रास होतो ते सांगितलं आहे.
पुणेकर वर्षा कदम यांनी काय म्हटलं आहे?
डी.जे. बंद झाले पाहिजेत. आमच्या घराच्या खिडक्यांना ज्या काचा आहेत त्या डी.जे. आणि डॉल्बीच्या आवाजामुळे थरथर करतात. जमिनीवरही तसाच अनुभव येतो. माझे वडील आजारी होते आणि मी त्यांना इथे राहायला आणलं. त्यानंतर गावाला घेऊन गेले. तेव्हा ते तिथे सीरियस झाले होते, त्यांना धाप वगैरे लागत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना मोठी धाप लागली. गावातल्या एका माणसाला गाडी घेऊन बोलवेपर्यंत माझे वडील माझ्या डोळ्यांच्या देखत गेले. माझ्या वडील सीरियस होते, जास्त दिवस जगणार नव्हते. पण शेवटच्या काही दिवसांमध्येही त्यांना सुखाने राहता आलं नाही. कारण डीजेचा प्रचंड त्रास त्यांना झाला होता. मी पहिल्या मजल्यावर घर घेतलं ते वडिलांसाठी, कुटुंबासाठी. जर त्यांनाच शांतता मिळणार नसेल तर या घराचा काय उपयोग आहे? असं वर्षा कदम यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे आणि डीजे बंदीची मागणी लावून धरली आहे.
मला म्हणतात तू घर का विकत नाहीस?
आता मला सांगितलं जातं आहे, पहिल्या मजल्यावर घर कशाला घेतलं? तुला डी.जे.चा त्रास होतो आहे तर घर विकून टाक हे मला वारंवार सांगण्यात आलं आहे. मी माझं घर का विकायचं? त्यापेक्षा डीजे आणि लाऊड स्पीकरचा आवाज का बंद केला जात नाही? जे कुणी मला सांगत आहेत त्यांनी एकदा स्वतः इथे बसावं आणि किती त्रास सहन करावा लागतो आहे ते अनुभवावं. आमच्या सोसायटीत डीजे विरोधात बोलू देत नाहीत. म्हणून आपण या मोर्चात सहभागी झाल्याचे वर्षा कदम यांनी सांगितले. मुलाला फिट्स येतात आणि वडील आजारी असल्याने पहिल्या मजल्यावर घर घेतले होते. मात्र, आता मला घर विकण्याचा सल्ला दिला जात आहे. वडिलांना त्रास होतोय म्हणून दहा वर्षे वडिलांच्या खोलीची खिडकी उघडली नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला त्रास होतो म्हणून डीजे विरोधात बोललो तर धर्माच्या विरोधात बोलता असा आरोप केला जातो असेही त्या म्हणाल्या.
डीजे विरोधात बोलतो म्हणून आम्हाला वाळीत टाकलं आहे
डीजे विरोधात बोलतो म्हणून आम्हाला वाळीत टाकले आहे. मैत्रिणींनी बोलणं बंद केलं आहे. डीजेचा इतरांनाही त्रास होतो, पण ते बोलत नाहीत. त्यांनाही वाटतं त्यांनाही वाळीत टाकलं जाईल. घर शिफ्ट करण्याचा सल्ला दिला जातो. आजारपण, लहान मुलाचं कारण दिलं तरी ते ऐकत नाहीत असेही वर्षा कदम म्हणाल्या. माझ्या मुलाला पाच वर्षांपासून फिट्सचा त्रास आहे. पाच वर्षांपासून मुलाला हा त्रास आहे. दहा वर्षे आम्ही पोलिसात तक्रार केली नाही. गणपतीच्या दिवसांमध्ये आम्ही बाहेर जायचो किंवा आठव्या मजल्यावर जाऊन झोपायचो असंही त्यांनी सांगितलं.
