जनरेटय़ापुढे मुख्यमंत्र्यांची माघार, राष्ट्रवादीने मौन सोडले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या दबावामुळे बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या बदलीचा घाट वाढत्या जनरेटय़ामुळे अखेर सरकारने मागे घेतला. मंत्रालयातून केंद्रेकर यांना बीडला रुजू होण्याचे आदेश बजावण्यात आले. उद्याच (शनिवारी) आपण बीडला रुजू होत असल्याचे केंद्रेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी टाकलेल्या दबावापुढे झुकून ‘कर्तव्यदक्ष अधिकारी’ अशी प्रतिमा असलेल्या केंद्रेकरांना जिल्हाधिकारीपदी रुजू होण्यास मुख्यमंत्र्यांनी मनाई केली होती. केंद्रेकर यांची बदली झाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार व मंत्री यांच्या विरोधात मुंबईपासून दिल्लीपर्यंत टीकेची झोड उठली. या स्थितीचा सामना कसा करायचा यात गोंधळून गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मौन बाळगणेच पसंत केले होते. मात्र, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करीत केंद्रेकर यांनी दुष्काळी स्थितीत सरकारला चुकीचा अहवाल दिला. त्यामुळे पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली, असा खुलासा केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांचा डाव फसला. पक्ष प्रवक्त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आष्टीत आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊनच केंद्रेकर यांच्यावर टीका केली. केंद्रेकर यांनी दुष्काळी स्थितीत चुकीच्या पद्धतीने काम केले. लोकप्रतिनिधी व प्रशासन ही एकाच रथाची दोन चाके आहेत, याचा त्यांना विसर पडला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, असे ते म्हणाले.