Beed Massajog Sarpanch Election Result Ashwini Deshmukh: बीडमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा आहे ती सरपंचपदाच्या निवडणुकीची. बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरलं होतं. यावर राजकीय वर्तुळातदेखील मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर मस्साजोगमध्ये होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख उतरल्या होत्या. यानंतर निवडणूक बिनविरोध होण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर केली गेली. पण अखेर ही निवडणूक झाली आणि त्यात अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीला मोठ्या प्रमाणावर भावनिक स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. खुद्द संतोष देशमुख यांची दोन्ही मुलं आईचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरली होती. त्यामुळे लोकांचा भावनिक पाठिंबा अश्विनी देशमुख यांच्या बाजूने असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपला कौल दिला असून ते ९२ मतांच्या फरकाने सरपंचपदी निवडून आले आहेत.
मस्साजोग निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीत एकूण १७४४ मतं जमा झाली होती. त्यापैकी ९१४ मतं स्वरुपानंद देशमुख यांना मिळाली असून अश्विनी देशमुख यांना ८२२ मतं मिळाली आहेत.
स्वरूपानंद यांचा गेल्या निवडणुकीत पराभव
गेल्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून स्वरूपानंद देशमुख यांना अवघ्या ९ मतांनी पराभूत व्हावे लागले होते. या निवडणुकीत स्वरूपानंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी गावातील काही गटांनी केली होती. मात्र, स्वरूपानंद देशमुख यांनी अखेरपर्यंत अर्ज मागे घेतला नाही. परिणामी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि यात अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
“कुणी काय आरोप केले हे मला माहिती नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की माझी जनता माझ्यासोबत आहे. आज मतदानरुपी आशीर्वादातून त्यांनी हे सिद्ध केलं आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी याआधीही कायम पुढेच होतो आणि सदैव त्यासाठी मी कायम पुढेच राहणार”, अशी प्रतिक्रिया विजयानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी दिली.
दीड वर्षापूर्वी संतोष देशमुख यांची हत्या
९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्या प्रकरणात अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोपदेखील झाले. यानंतर वाल्मिक कराडसह काही आरोपींना अटकदेखील करण्यात आली. या काळात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सातत्याने प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून, तसेच सरकार दरबारी केलेल्या अर्ज-विनंत्यांच्या माध्यमातून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी जोरकसपणे मांडली होती.
