बीड जिल्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. दरम्यान यावेळी धनंजय मुंडे यांना काही आंदोलनकर्त्यांचाही सामना करावा लागला. एकीकडे दुकानासमोरील खराब झालेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी एका व्यक्तीने धनंजय मुंडे यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे बीड नगर परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांना झाडावर चढून आंदोलन केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय झालं?

बीडमध्ये नगर परिषदेच्या दोन सफाई कर्मचारी महिलांनी झाडावर चढून आंदोलनाला सुरुवात केली होती. वेतन रखडल्यामुळे त्रस्त झाल्याने संसार कसा करायचा अशी विचारणा करत महिला कर्मचारी आंदोलन करत होत्या. आपल्या मागण्या पूर्ण केल्या जाव्यात, वेतन मिळावं, यासाठी त्यांनी झाडावर चढून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

यावेळी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत महिला झाडावर चढून आंदोलन करत असल्याचं पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांचीही धावपळ सुरु झाली.

याचवेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागरही आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. अखेर हे आंदोलन मिटवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आमदार संदीप क्षीरसागर हे शिडीच्या सहाय्याने थेट झाडावर चढले आणि आंदोलनकर्त्या महिलांशी चर्चा करण्यास सुरुवात केली. त्यांनी विनंती केल्यानंतर आणि सगळ्या शंकांचं निरसन केल्यानंतर अखेर वाद मिटला. यानंतर आंदोलनकर्त्या महिला अखेर झाडावरुन खाली उतरल्या.

हा सर्व प्रकार धनंजय मुंडे यांच्यासमोरच सुरु होता. जवळपास १० मिनिटं संदीप क्षीरसागर झाडावर उभे राहून महिलांची समजून काढत होते. दरम्यान धनंजय मुंडे यांनी समस्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.

धनंजय मुंडेंसमोर आत्महदनाचा प्रयत्न

दुसरीकडे पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांसमोरच एका व्यक्तीने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव विनोद शेळके असं असल्याची माहिती समोर आलीय. दुकानासमोरील खराब झालेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, या मागणीसाठी त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

बीड पालवन रोड ते पिंपळवाडी या रस्त्याचे बोगस काम झाले असून यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेळकेंकडून करण्यात आलाय. या रस्त्यामध्ये शेळके यांचं आर्थिक नुकसान झालंय, त्यामुळे अनेकदा तक्रारी करुनही ठेकेदारावर कारवाई न केल्याने आज प्रजासत्ताक दिनी शेळके यांनी पालकमंत्र्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या प्रकरणामध्ये यंत्रणाचा चांगलाच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं.

“कुठलाही रस्ता हा कोणत्या एका व्यक्तीसाठी नसतो. एखाद्या व्यक्तीला वाटलं की तो रस्ता बोगस होतोय, तर त्याबाबत चौकशी केली जाईल. त्या व्यक्तीने इथं येऊन अंगावर रॉकेल टाकून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीने चौकशी करण्याची वनंती करणारं पत्र जरी दिलं असतं. त्या रस्त्याच्या बांधकामासंदर्भात आम्ही चौकशी करण्याचे आदेश दिलेत,” असं या प्रकरणानंतर बोलताना धनंजय मुंडेंनी सांगितलं.

More Stories onबीडBeed
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed nagar parishad woman employee protest ncp dhananjay munde sandip kshirsagar sgy
First published on: 26-01-2022 at 16:28 IST