बीड: बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. गोदावरी नदी पात्रात तब्बल ३५ भाविकांना घेऊन जाणारी एक नाव (बोट) उलटल्याची घटना बुधवारी घडली. या भीषण अपघातात एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यामुळे नावेचा तोल गेला आणि हा अपघात घडला.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने दुर्घटना

पुरुषोत्तमपुरी येथे सध्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल झाले आहेत. बुधवारी ३५ भाविक नदी ओलांडण्यासाठी एका नावेमध्ये बसले होते. मात्र, नावेच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रवासी त्यात बसवण्यात आले होते. नदीच्या मध्यभागात पोहोचताच पाण्याचा प्रवाह वाढला आणि ओव्हरलोडिंगमुळे नावेचा समतोल बिघडला. काही सेकंदांतच ही नाव प्रवाशांसह नदीत उलटली. नाव उलटताच नदीपात्रात एकच आक्रोश निर्माण झाला.

स्थानिक आणि पोलिसांकडून बचावकार्य

घटना घडताच नदीकाठावरील स्थानिक नागरिक आणि तैनात असलेल्या पोलिसांनी तातडीने नदीत उड्या घेतल्या. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून पाण्यात बुडणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. स्थानिक लोकांच्या प्रसंगावधानाने ३४ भाविकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

मृत आणि जखमींची माहिती

या अपघातात प्रमिला राठोड नावाच्या महिला भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सिंधूबाई मावळ (रा. महागाव, जि. वाशीम) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘एसडीओ’ पातळीवर चौकशीचे आदेश

या गंभीर घटनेची दखल घेत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी (SDO) पातळीवर चौकशीचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश त्यांनी तपास पथकाला दिले आहेत. “नावेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कसे बसवले गेले? सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन कुठे झाले? याची सखोल चौकशी केली जाईल. या निष्काळजीपणासाठी जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला आहे.

सुरक्षेचे दावे फोल?

धार्मिक कार्यक्रमासाठी पुरुषोत्तमपुरीत भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज प्रशासनाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनातर्फे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र, एवढी मोठी गर्दी असतानाही नाव चालकांकडून झालेल्या या निष्काळजीपणाकडे पोलिसांचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष कसे झाले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.