बीड : वडवणी तालुक्यातील रुई (पिंपळा) येथे बाळराजे कन्स्ट्रक्शन रेडी मिक्स कॉन्क्रीट केंद्रात एका १६ वर्षीय बालकामगाराचा मिक्सरमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ८) दुपारी घडली. अमोल मच्छिंद्र जावळे (वय १६, रा. खंडोबाचीवाडी, ता. वडवणी) असे मृत बालकामगाराचे नाव आहे. सोन्नाखोट्टा ते देवळा या रस्त्याच्या कामासाठी रुई येथे बाळराजे कन्स्ट्रक्शन रेडी मिक्स कॉन्क्रीट केंद्र उभारण्यात आले आहे. या प्लांटवर अमोल जावळे हा अल्पवयीन मुलगा कामासाठी होता. काम सुरू असताना तो अचानक आर.एम.सी. मिक्सरमध्ये पडला. यंत्राच्या फेऱ्यात सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दुर्घटना घडल्यानंतर मिक्सर केंद्रावरील कामगार व इतर कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाले. काही वाहनांच्या संशयास्पद हालचालींमुळे ग्रामस्थांनी सिमेंट मिक्सर केंद्राकडे धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, केंद्रावरील ऑपरेटर व जबाबदार व्यक्ती उपलब्ध नसल्याने अमोलचा मृतदेह तब्बल चार ते पाच तास मिक्सरमध्येच अडकून राहिला. मृतदेह बाहेर कसा काढायचा यावरून मोठा प्रश्न निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे, उपनिरीक्षक शाम गायकवाड व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
शवविच्छेदनाची प्रक्रिया चालू आहे
याबाबत वडवणी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे अशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात येईल.
कमी पैशांमध्ये जास्त वेळ कामांसाठी लहान मुलांचा वापर
कमी पैशांमध्ये जास्त वेळ काम करण्यासाठी बालमजुरांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे सर्रास बालकामगार ठेवले जातात. त्यांना कामावर ठेवल्यामुळे त्यांचे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक नुकसान होते व त्यांना व्यसनांची सवयही लागते बालकामगार कायद्यानुसार संबंधित एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात यावा.- तत्त्वशील कांबळे,बालहक्क कार्यकर्ते
