लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : राज्यभरात वटपोर्णिमेचा सण आज उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातही महिलावर्गात या सणाचा उत्साह दिसून येत होता मात्र पोलादपूर तालुक्यातील निवे गावात वटपूजनासाठी गेलेल्या महिलांवर मधमाश्यांनी हल्ला चढवला. यात १२ महिला जखमी झाल्या आहेत.

पोलादपूर तालुक्यात सर्वत्र सव्वाशिणींचा वटसावित्रीपूजनाचा सण आनंदात आणि उत्साहामध्ये सुरू असताना अचानक पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये तब्बल ११ महिला आणि १ पुरूष असे १२ जण मधमाशांच्या डंखाने बेजार झाल्याने दाखल करण्यात आल्याची माहिती थडकली. या बातमीने ग्रामीण भागातील सर्वच जण प्रचंड हवालदिल झाले. निवे गावातील वटवृक्षाखाली पाच- सहा महिलांची पूजा झाल्यानंतर आणखी चार पाच जणी वटवृक्षाखाली पुजेसाठी जमल्या. यामुळे सर्वांच्या पुजेनंतर नारळ फोडण्यासाठी महिलांनी साधारण १०० फूट अंतरावर शेतात बांधांवरील गवताची बेणणी करणाऱ्या अनंत नाना तळेकर यांना हाक मारून बोलावून घेतले.

आणखी वाचा-सातारा: सलमानच्या भेटीसाठी खासदार श्रीकांत शिंदे

अनंत तळेकर यांनी नारळावरील सालं काढून तो फोडण्यासाठी आपटणार तोच हजारो मधमाशांनी त्यांना वेढले आणि चावे घेण्यास सुरूवात केली. यावेळी महिलांनादेखील मधमाशांनी डंख करण्यास सुरूवात केली. अशा अवस्थेत अनंत तळेकर यांनी जवळच्या मंदिरामध्ये सर्व महिलांना जाण्यास सांगून मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराचा दरवाजादेखील बंद करून घेतला. मात्र, तोपर्यंत महिलांना मधमाशांनी डोक्यावरील केसांमध्ये, चेहऱ्यावर तसेच हातावर आणि मानेवर दंश केल्याने सर्वांनाच वेदना असह्य होऊन त्या मंदिरामध्ये लोळू लागल्या. यानंतर काही वेळाने मधमाशा पांगल्या आणि अनंत तळेकर आणि सर्व महिलांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून पोलादपूर ग्रामिण रूग्णालयामध्ये दाखल केले. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

वनिता बबन चिकणे, कविता नितीन चिकणे, दिपाली सचिन चिकणे, पार्वती भाऊ तळेकर, ज्योती जगदीश तळेकर, अनुसया गणपत तळेकर, सुशिला विश्वनाथ तळेकर, शेवंती पांडूरंग तळेकर, भारती बाबाजी तळेकर, गीता ज्ञानेश्वर तळेकर, शैला अनंत तळेकर आणि अनंत नाना तळेकर अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.