नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील रिक्त जागा भरण्याच्या विषयात सहकार खात्यासह राज्य निवडणूक प्राधिकरणाने आपली चूक दुरुस्त केली असून, उपाध्यक्ष निवडण्याआधी आता संचालकपदाची रिक्त जागा भरली जाणार आहे.
जिल्ह्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते हरिहरराव भोसीकर यांच्या निधनामुळे बँकेतील संचालकपद आणि उपाध्यक्षपदही मे महिन्यामध्ये रिक्त झाले होते. त्यानंतर बँक प्रशासनाने या दोन्ही रिक्त पदांची माहिती लातूरच्या विभागीय सह निबंधकांना गेल्या महिन्याच्या आरंभीच कळविली होती. त्यानुसार बँकेच्या इतर मागासवर्ग मतदारसंघाचे संचालकपद निर्धारित कार्यपद्धतीनुसार भरणे क्रमप्राप्त व अनिवार्यही होते. पण प्राधिकरणाने आधी उपाध्यक्षपद भरण्याचा घाट घातला होता. यातील विसंगतीबद्दल ‘लोकसत्ता’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधितांनी दोषदुरुस्ती केली असल्याचे सांगण्यात आले.
बँकेतील रिक्त पदे भरण्याची जबाबदारी जिल्हा उप निबंधकांवर टाकण्यात आली आहे. त्यांनी उपाध्यक्ष निवडीची बैठक २२ जुलै रोजी निश्चित केल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट झाले होते. आता याच अधिकाऱ्याने २१ जुलै रोजी एक स्वतंत्र बैठक आयोजित केली असून, त्यात रिक्त झालेले संचालकपद भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
हरिहरराव भोसीकर यांचे ज्येष्ठ पुत्र शिवकुमार भोसीकर हे संचालकपदासाठी इच्छुक असून, त्यांनी बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह आ. प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन वडिलांच्या रिक्त जागेवर त्यांची निवड केली जावी, अशी विनंती या नेत्यांना तसेच इतर संचालकांनाही केली आहे.
बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत पुढील वर्षी एप्रिल-मे दरम्यान संपणार असल्यामुळे नव्या संचालक आणि उपाध्यक्षास जेमतेम सहा महिन्यांकरिता संधी मिळणार आहे. २१ जुलैच्या संचालक निवडीच्या बैठकीची सूचना सोमवारी दुपारनंतर जारी झाल्याचे सांगण्यात आले.
बँकेच्या संचालक मंडळात बापूराव पाटील आष्टीकर, बापूसाहेब गोरठेकर, नामदेवराव केशवे, वसंतराव चव्हाण या माजी संचालकांचे राजकीय वारस सध्या कार्यरत आहेत. आ. चिखलीकरांचे पुत्रही संचालक मंडळामध्ये आहेत. त्यानंतर भोसीकरांचे पुत्रही संचालक होऊ पाहत आहेत.