केतन अग्रवाल या तरुणाचा लोहगडावरुन पडून १८ जूनला मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात आहे अशी माहिती समोर आली होती. पण त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी त्याला लोहगडावरुन ढकलून देत त्याची हत्या केली असा आरोप आहे. या दोघांनाही या प्रकरणात २३ जून रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर या घटनेबाबत आणि सिया तसंच चेतनबाबत विविध पैलू समोर येत आहेत. आता सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी गुपचूप लग्न केलं होतं का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
नेमकी काय माहिती समोर आली?
पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की आम्ही सध्या सिया आणि चेतन यांच्यातले Whats App चॅट तपासत आहोत. दोन्ही आरोपींनी केतनला ठार करण्यापूर्वी गुपचूप लग्न केलं होतं का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. सिया आणि चेतन यांनी जर लग्न केलं असेल तर ते कुठे केलं? त्यांनी विवाह नोंदणी केली आहे का? त्यासंबंधीचे काही तपशील मिळत आहेत का? याचा तपास आम्ही करत आहोत. आम्हाला याबाबत काही ठोस पुरावे मिळाले आहेत असंही या अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

२३ जून रोजी सिया आणि चेतनला अटक
२३ जूनला सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांवरही केतन अग्रवालला लोहगडावरुन ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या दोघांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ज्यानंतर आता सिया आणि चेतनला १६ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतनची हत्या सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन या दोघांनी कट रचून केली असंही पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ फेब्रुवारीला सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचा साखरपुडा झाला होता. तर चेतन आणि सिया हे ऑक्टोबर महिन्यापासून संपर्कात होते आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. सियाला केतन अग्रवालशी लग्न करायचं नव्हतं. केतनला घेऊन सिया १४ जून रोजीही लोहगडावर गेली होती. तिथे तिने त्याला धक्काही दिला. पण तो झुडुपांमध्ये अडकल्याने वाचला, ज्यानंतर साप आल्याचा बनाव सियाने रचला होता. १८ जूनला मात्र सिया आणि चेतन या दोघांनीही केतनला धक्का देऊन ठार केलं असा आरोप या दोघांवर आहे. सिया आणि चेतन या दोघांनीही गेल्या वर्षी घडलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनम रघुवंशीने काय काय केलं होतं त्यासंबंधीच्या बातम्या वाचल्या होत्या असंही पोलिसांनी सांगितलं. आता या दोघांनी गुपचूप लग्न केलं होतं का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. काय सत्य समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
