केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी ५ हजार ०५३क पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयलने लोहगडावरून ढकलून देत त्याची हत्या केली असा आरोप तिच्यावर आहे. तसंच तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यानेही तिला साथ दिली असाही आरोप आहे. या प्रकरणात या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस तापासात जी माहिती समोर आली त्यानंतर या प्रकरणातील तिसरा आरोपी रितेश हांगे यालाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या चार्जशीटमध्ये काय उल्लेख आहे?

केतन अग्रवाल आणि सिया गोयल या दोघांचाही साखरपुडा फेब्रुवारी २०२६ मध्ये झाला होता. तर जयपूर या ठिकाणी नोव्हेंबर २०२६ मध्ये या दोघांचं लग्न होणार होतं. मात्र जून महिन्यात सिया गोयलने केतनची लोहगडावरून ढकलून देत हत्या केली असा आऱोप तिच्यावर आहे. आता पोलिसांच्या चार्जशीटमधील माहितीनुसार केतन अग्रवालला लोहगडावरून ढकलून देण्यापूर्वी त्याला बंगळुरूला न्यायचं आणि तिथे जाऊन त्याची हाडं मोडायची असा कट सिया आणि चेतन यांनी रचला होता. मात्र या कटाला चेतनच्या मित्राने विरोध केला ज्यानंतर सिया आणि चेतन या दोघांनी लोहगडावरून केतनला ढकलून ठार मारायचं हा कट रचला. पोलिसांनी पकडलंच तर त्यांना कसं टाळायचं? यासंबंधीचा पॉडकास्ट त्यांनी ऐकला होता. तसंच केतनची हत्या करण्यापूर्वी त्यांनी काही गोष्टी चॅटजीपीटीला विचारल्या होत्या आणि हत्येशी संबंधित असलेले काही चित्रपटही पाहिले होते असंही या चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

६ जूनला काय घडलं?

६ जून २०२६ ला केतन आणि सिया हे दोघंही प्री वेडिंग शूटसाठी बाली या ठिकाणी जाणार होते. पुण्याहून मुंबई एअरपोर्टला जाण्यासाठी हे दोघं कारने निघाले होते. त्यावेळी खालापूर या ठिकाणी असलेल्या फूड प्लाझामध्ये सियाने वॉशरूमला जाण्याचा बहाणा केला आणि त्यावेळी केतनचा पासपोर्ट फाडून तो तिथल्या कचरापेटीत फेकला होता. मुंबई एअरपोर्टला गेल्यानंतर केतनचा पासपोर्ट हरवल्याचा बहाणा करून ही ट्रीप तिने रद्द केली होती असाही आरोप तिच्यावर आहे. सियाला हा पासपोर्ट वाटेत फाडून टाक ही कल्पना चेतन चौधरीने सुचवली होती असाही उल्लेख या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. तसंच सियाने एक फेक इन्स्टाग्राम अकाऊंट माही नावाने उघडावं असंही चेतनने सियाला सुचवलं होतं. हे अकाऊंट नंतर डिलिट करण्यात आलं होतं. चार्जशीटमध्ये असाही उल्लेख करण्यात आला आहे की सिया गोयलने अनेकांशी या विषयावर चर्चा केली होती की तिला केतन अग्रवालशी लग्न करायचं नाही.