बनावट आधारकार्ड तयार करण्याचा धंदा राज्यात भरभराटीला आला आहे. गुन्हेगारांनी अशा आधारकार्डचा वापर करून मोबाइलची सिमकार्ड खरेदी केली. त्यामुळे समाजमाध्यमांवर त्यांना बनावट खाते उघडता आले. विशेष म्हणजे पोलिसांची नजर चुकवून अटकही टाळता आली असून बनावट कार्डला लगाम घालणारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे.

खून, खंडणी, मालमोटार लूट, रस्तेलूट आदी गंभीर गुन्ह्य़ांतील आरोपी चन्या ऊर्फ सागर अशोक बेग, टिप्या ऊर्फ आकाश अशोक बेग हे दोघे कुप्रसिद्ध गुन्हेगार गेल्या दीड वर्षांपासून फरार होते. त्यांच्याविरुध्द मोक्का कायद्याखाली दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातही ते फरार होते. नगर पोलिसांनी आतापर्यंत अनेक पथके तयार करूनही त्यांचा शोध लागत नव्हता. नवी मुंबई गुन्हे शाखाही त्यांच्या मागावर होती. पण त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने कंटेनरमधील कोटय़ावधी रुपयांच्या लुटीला आळा घालता आलेला नव्हता. बनावट आधारकार्डच्या माध्यमातून त्यांनी बाहेर राहून गुन्हेगारी कारवाया चालविल्या अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
pro bjp surrogate ads run on meta
आचारसंहिता जाहीर होताच स्वतंत्र जाहिरातदारांकडून सोशल मीडियावर भाजपाच्या समर्थनार्थ जाहिराती; ८५ लाख रुपये खर्च
government and government parties on social media viral claim false
आचारसंहितेनंतर सोशल मीडियावर सरकार, राजकीय पक्षांविरोधात लिहिणाऱ्यांवर होणार कारवाई? व्हायरल दावा खरा की खोटा, वाचा

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने त्यांना नुकतीच अटक केली. तपासात अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत असून त्यामध्ये बनावट आधारकार्डचा गुन्हेगारांकडून होत असलेला वापर बघून पोलिस थक्क झाले आहेत. चन्या बेग हा फरार असलेल्या दोन वर्षांच्या कालावधीत त्याने १५० मोबाइल बदलले. ज्या वेळी त्याला अटक केली तेव्हा त्याच्याकडे १४ मोबाइल आढळून आले. विशेष म्हणजे दोघांनीही बनावट आधारकार्ड तयार करून घेतले होते. चन्या याने राहुल पवार तर टिप्या याने किरण कोठुळे या नावाने आधारकार्ड तयार केले होते. हे आधारकार्ड नाशिक येथील सागर खैरनार या गुन्हेगाराने तयार करून दिले. खैरनार हा पंचवटी येथील एका खुनाच्या प्रकरणात अटक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. खैरनार याने अनेक गुन्हेगारांना बनावट आधारकार्ड तयार करून दिले आहे. सिमकार्ड खरेदीकरिता हे आधारकार्ड वापरले जात होते असे पुढे आले आहे. शहरातील खुनाच्या घटनेनंतर सुमारे १५ पथके पोलिस अधीक्षकांनी तयार केली. पण तरी देखील त्याचा शोध लागलेला नव्हता. त्यामागे बनावट आधारकार्डचा वापर करून दोघा भावांनी वारंवार वेगवेगळे सिमकार्ड खरेदी करून त्याचा वापर केल्याचे पुढे आले आहे.

चन्या हा नेहमी केवळ लखन माखिजा याच्याशीच दूरध्वनीवर बोलत असे. वाळुतस्करांकडून वसुली करताना त्यांच्याशी माखिजा याचा मध्यस्थ म्हणून वापर केला. माखिजा हा चन्या व टिप्याचा खास मित्र आहे. टोळी चालविण्याचे काम त्याच्या माध्यमातून होत असे. माखिजा याला तीन महिन्यांत चन्याने सुमारे ९०० वेळा दूरध्वनी केले होते. तोच दोघांचा दुवा होता. आता तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. वाळुतस्करांनी दिवसाला एक लाख रुपयांची खंडणी चन्याला दिली. तसेच काही सावकारांनी वसुलीचे काम दिले होते. एका राजकीय कार्यकर्त्यांने उधारीवर विकलेल्या मोबाइल संचाच्या पशाची वसुली त्यांच्याकडे सोपविली. कोटय़वधी रुपये मिळवूनही त्यांच्याकडे केवळ २० हजार रुपये आढळून आले. बहिणीच्या लग्नात ४० लाख रुपये खर्च केले. बेलापूरच्या रामगडनजीक चाँदनगरमध्ये एका भूखंड प्रकरणात हस्तक्षेप केल्याने ४ गुंठे जागा मिळाली. तेथे बंगल्याचे अर्धवट काम सुरू आहे. एवढीच काय ती मालमत्ता त्याच्याकडे सापडली आहे.

चन्या व टिप्या यांची जीवनशैली ही अत्यंत ऐशोआरामी अशा पद्धतीची होती. पुण्यात तो सुधीर काळोखे या सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाच्या सदनिकेत राहत होता. त्याला २५ हजारांचे भाडे होते. तसेच सिन्नर येथेही ते भाडय़ाने सदनिका घेऊन राही. स्कोडा कंपनीची मोटार ते वापरत. कपडे, मोबाइल व पाटर्य़ा यावरच त्यांचा लाखोंचा खर्च झाला. पसे आहेत तोपर्यंत मौजमजा करायची अन् पसे संपले की, कंटनेर लुटायचे हा त्यांचा उद्योग होता. शिर्डी येथील प्रदीप सरोदे याच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. सरोदे हा देखील त्यांना नेहमी मदत करीत होता. चन्या याने दिलेले गावठी कट्टे सरोदे याच्याकडेच होते. चन्या हा मिळालेल्या पशातून आठ ते दहा गुन्हेगारांचे घर चालवीत होता. लुटलेला सिगारेटचा कंटेनर सुमारे दीड कोटीला विकूनही आज दोघे भाऊ कंगाल असून त्यांच्याकडे अवघे २० हजार रुपये सापडले आहेत.

स्वतच्या कौतुकाची गाणी

चन्या बेगच्या टोळीला मदत करणारा शिर्डी येथील प्रदीप सरोदे यालाही सहआरोपी करण्यात येणार आहे. सरोदे याने स्वतचे गुणगान करणारे गाणी तयार करून घेतली असून तिच्या ध्वनिफिती वाटल्या आहेत. स्वतला डॉन म्हणून घेण्यासाठी हा उद्योग त्याने केला आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.