scorecardresearch

‘किसन वीर’च्या कामगारांचे आंदोलन मागे

किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज तिसऱ्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिलेल्या आश्वासनानंतर  मागे घेण्यात आले.

वाई: किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले ठिय्या आंदोलन आज तिसऱ्या दिवशी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिलेल्या आश्वासनानंतर  मागे घेण्यात आले. मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या पगारासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवार (दि.२१) पासून कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात चारशे कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल पाठिंबा जाहीर केला. आज आंदोलनाचा तिसरा दिवस होता. आज दुपारी चार वाजता कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले आंदोलनस्थळी दाखल झाले. या वेळी कामगार प्रतिनिधींनी त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. भोसले यांनी त्यावर कामगारांच्या प्रतिनिधीशी सकारात्मक चर्चा केली. तुमच्या सर्व मागण्या ज्ञात आहेत, त्या अवास्तव नाहीत. २७ टक्के वेतनवाढीचा प्रश्न महिना अखेपर्यंत मार्गी लावण्यात येईल. ग्रॅज्युएटी व प्रॉव्हिडंट फंडाचे हप्ते लवकर भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. हंगामी कामगारांचा ग्रेडेशन प्रश्न मार्गी लावून त्यांना कायम करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गळीत हंगाम सुरू करण्यासाठी कामगारांनी सहकार्य करावे अशी विनंती  त्यांनी कामगारांना केली. भोसले यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर कारखाना सुरू झाला तरच आपले प्रश्न मार्गी लागतील हे लक्षात घेऊन कामगार प्रतिनिधींनी आंदोलन मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Behind kisan veers workers agitation cooperative sugar factory place agitation filed ysh

ताज्या बातम्या