कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकी पाठोपाठ बेळगाव महापालिकेतही भाजपाची सरशी पाहायला मिळाली आहे. भाजपाने ३६ जागा मिळवत महापालिकेवर विजय मिळवला आहे. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला आहे. बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं आहे. त्यावरुन आता भाजपा आमदाराने शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. बेळगावमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता येईल असा संपूर्ण महाराष्ट्राला विश्वास आहे. तिथले मराठी भाषिक एकत्र आले आहेत आणि पुन्हा पालिकेवर भगवा ध्वज फडकवतील. आमच्या मनात जे आहे तेच व्हाव अशी आशा आम्ही करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपाने बेळगाव महापालिकेवर सत्ता मिळवली आहे.

निकालानंतर भाजपा आमदार राम सातपुते यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “बेळगाव मध्ये जाऊन भाजपा विरोधात वाचाळ बडबड करणारे संजय राऊत यांच्या शिवसेनेला बेळगाव च्या जनतेने कात्रजचा घाट दाखवला..! जनतेने शिवसेनेच्या वायफळ प्रांतवादाला लाथाडून राष्ट्रवाद जिंकवला. जय श्रीराम,,” असे राम सातपुते यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बेळगाव महापालिकेच्या ५८ प्रभागांसाठी शुक्रवारी प्राथमिक अंदाजानुसार ५५ टक्के मतदान झाले होते. मराठी अस्मितेचे दर्शन घडवण्यासाठी मराठी भाषकांनी हिरिरीने मतदानात सहभाग नोंदवला होता. सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेची निवडणूक आठ वर्षांनंतर झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रथमच चिन्हावर उतरले होते. त्यामध्ये भाजपा ५५, काँग्रेस ४५, धर्मनिरपेक्ष जनता दल ११, आम आदमी ३७, एमआयएम ७, अन्य दोन अपक्ष अशा २१७ उमेदवारांचा समावेश होता.