संगमनेर : तब्बल २७ वर्ष ‘पिंटय़ा’ त्या कुटुंबाचा एक घटक होता. कुटुंबातल्या अनेक सुखदु:खाच्या प्रसंगाचा तो साक्षीदार होता. कुटुंबातली लहान मुलं त्याच्या अंगाखांद्यावर खेळतच मोठी झाली. आपला जोडीदार ‘सुरत्या’सह आयुष्यभर राबराब राबून कुटुंबाला प्रगतिपथावर नेण्यात त्याचा मोठा वाटा होता. ‘पिंटय़ा’च्या अचानक झालेल्या दुर्दैवी निधनाने ‘सुरत्या’ सैरभैर झाला आणि ते कुटुंबही शोकसागरात बुडाले. मालकाने पिंटय़ाचा दशक्रिया विधी करत त्याच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, यासाठी वृक्षारोपण केले आणि गावातील शाळेला देणगीही दिली.

संगमनेर तालुक्यातल्या सावरगाव तळ येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब पांडुरंग नेहे यांच्या गोठय़ातील दावणीला असलेली पिंटय़ा आणि सुरत्या ही बैल जोडी. त्यातल्या पिंटय़ाच्या निधनाची ही अनोखी कहाणी सर्वाच्याच मनाला चटका लावून गेली.

गेली २७ वर्ष ही बैलजोडी नेहे यांच्या शेतात राबली. संपूर्ण कुटुंबालाच या बैलजोडीचा मोठा लढा लागला होता, किंबहुना ते या कुटुंबाचाच एक भाग होऊन बसले होते. त्यापैकी पिंटय़ाचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. सत्तावीस वर्षांचा सोबती अचानक निघून गेल्याने त्याचा जोडीदार सुरत्या पूर्णत: सैरभैर झाला होता. नेहे कुटुंब देखील प्रचंड दु:खी झाले होते. या बैलजोडीच्या साहाय्यानेच नेहे यांनी आपल्या शेतीत काबाडकष्ट करत नंदनवन फुलवले होते. त्यातून आर्थिक सुबत्ता आल्याने त्यांचे जीवन सुखकारक झाले आहे. बाळासाहेबांचे या पिंटय़ा-सुरत्या बैलजोडीवर आपल्या मुलांप्रमाणे अतोनात प्रेम होते.

पिंटय़ाच्या मृत्यूने आपल्या कुटुंबातील एक सदस्य गेल्याचे तीव्र दु:ख नेहे कुटुंबाला झाले. एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर ज्या उत्तर क्रिया केल्या जातात, त्या सगळय़ा उत्तर क्रिया करण्याचे नेहे कुटुंबीयांनी ठरविले. त्यानुसार दहा दिवसांचा दुखावटा पाळून त्याचे सर्व धार्मिक विधी पूर्ण करत दशक्रिया विधीही केला. दशक्रिया विधीला मोठय़ा संख्येने गावकरी आणि सगेसोयरेही उपस्थित होते. या प्रसंगी ह.भ.प  एरंडे महाराज यांची प्रवचन सेवा तर पुरोहित नंदू जाखडी यांनी सर्व धार्मिक विधी पार पाडले.

पिंटय़ा बैलाच्या स्मृति चिरंतन जतन करण्यासाठी केशर आंबा रोपांचे रोपण करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी संगणक कक्ष निर्मितीसाठी भरीव आर्थिक देणगीही देण्यात आली. बाळासाहेब नेहे यांनी राबविलेल्या ह्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेहे कुटुंबीयांनी आपल्या बैलाच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी केलेल्या या कृतीची पंचक्रोशीत मोठी चर्चा झाली. ‘ज्या जनावरांमुळे आपली प्रगती झाली, त्यांच्याप्रती अशी सहृदयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या व्यक्ती समाजात आहेत, हेच यातून दिसून येते,’ अशी प्रतिक्रिया पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी व्यक्त केली.