BEST Electric Bus Fire Chembur incident : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसचे सातत्याने अपघात होत असताना बसचालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मुंबईतील चेंबूर कॅम्प परिसरातील मोनोरेल स्टेशनजवळ रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या बेस्टच्या एका इलेक्ट्रिक बसला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. ही बस भाडेतत्वांतर्गत असून, देवणार डेपोमधून ‘श्री मारुती ट्रॅव्हल्स’ (डागा ग्रुप) कडून चालवली जात होती. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं.
केबिनमधून धूर अन्…
बस मार्ग क्रमांक ए-३६५ वरून महुल गाव ते ट्रॉम्बे अशी जात असताना चालकाला केबिनच्या खालून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. तपासणी केली असता बॅटरी बॉक्समध्ये ठिणगी पडून शॉर्ट सर्किट झाल्याचं समोर आलं, यामुळे ही आग भडकली. बसमधील कर्मचाऱ्यांनी गाडीत उपलब्ध असलेल्या तिन्ही अग्निशामक सिलिंडरचा वापर करून अवघ्या १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवलं. आग आटोक्यात आल्यानंतर मुंबई अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बॅटरीची जोडणी तोडली आणि ती बसमधून बाहेर काढली. या घटनेनंतर स्थानिक पोलीस, बेस्टचे अधिकारी आणि महानगरपालिकेच्या वॉर्डचे कर्मचारीही तातडीने घटनास्थळी पोहोचले.
बेस्टच्या ताफ्यातील बसला आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही, तर याआधीही अलीकडच्या काळात अशा काही घटना घडल्या आहेत. मे महिन्यात, कुर्ला डेपोमध्ये स्विच मोबिलिटीद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका रिकाम्या इलेक्ट्रिक डबल-डेकर बसला तांत्रिक बिघाडामुळे आग लागली होती.
त्यानंतर त्याच महिन्यात, सायन-प्रतिक्षा नगर डेपोमध्ये बेस्टच्या दोन सीएनजी बसला एकाच तासाच्या अंतराने आग लागल्याची घटना घडली होती. या लागोपाठ घडलेल्या दुर्घटनांनंतर, बेस्टने आपल्या संपूर्ण ताफ्याची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले होते आणि कोणतीही गाडी रस्त्यावर उतरवण्यापूर्वी तिची कडक तपासणी बंधनकारक केली होती.
दरम्यान, बेस्ट बसच्या चालकांकडून सातत्याने अपघात होऊन जीवितहानी होत आहे. त्यातच, चालकाच्या प्रसांगवधनामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला आहे. त्यामुळे चालकाचे कौतुक होत आहे.
