Konkan Summer Vacation Guide : मुलांच्या परीक्षा संपून आता शाळांना उन्हाळाच्या सुट्ट्याही लागल्या असतील. एव्हाना कुठे जायचं कसं जायचं हे ठरलंच असेल. पण समजा समर वॅकेशनसाठी तुमचं काहीच ठरलं नसेल, बजेट कमी असेल आणि तुम्हाला तरीही कुटुंबासोबत कुठेतरी छान ठिकाणी जायचं असेल तर कोकण सर्वात उत्तम पर्याय आहे. कडक उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते कोकणातील थंडगार वाऱ्याचे. आंबा, फणस आणि काजूच्या बागांसोबतच कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांना साद घालतात. जर तुम्ही कुटुंबासोबत फिरण्याचे नियोजन करत असाल, तर कोकणातील ही निवडक ठिकाणे तुमच्या यादीत असायलाच हवीत.

    रत्नागिरी

    रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात मे महिन्यात पर्यटकांचा ओघ वाढतो. तसंच, आरे-वारे समुद्रकिनारा, थिबा पॅलेस आणि रत्नागिरी किल्लाही येथे पाहण्यासारखा आहे. थील स्वच्छ किनारे आणि आंब्याच्या बागांची सफर तुम्ही करू शकता.

    मालवण आणि तारकर्ली

    ज्यांना पाण्यातील खेळांची (Water Sports) आवड आहे त्यांच्यासाठी हे नंदनवन आहे. येथे गेलात तर, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्लीचा पांढऱ्या वाळूचा किनारा आणि देवबाग संगम नक्की पाहा. येथे तुम्ही स्कुबा डायव्हिंग (Scuba Diving) आणि स्नॉर्कलिंग करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे मालवणी जेवण (मासे आणि सोलकढी) नक्की ट्राय करा.

    अलिबाग

    मुंबई आणि पुण्याजवळ असल्याने उन्हाळी सुट्टीसाठी हे अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे.
    कुलाबा किल्ला, वरसोली समुद्रकिनारा, नागाव बीच आणि रेवदंडा किल्ल्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. येथे अनेक वॉटर स्पोर्ट्स आणि आलिशान रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. अलिबागचीही खाद्यसंस्कृती प्रसिद्ध आहे.

    श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिवेआगार

    शांती आणि धार्मिक वातावरणासाठी ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. हरिहरेश्वर मंदिर (ज्याला दक्षिण काशी मानले जाते), दिवेआगारचा समुद्रकिनारा सुंदर आहे. इथले समुद्रकिनारे अतिशय शांत आणि सुरक्षित आहेत, जे फॅमिली ट्रिपसाठी उत्तम आहेत.

    दापोली

    दापोलीला ‘कोकणचे महाबळेश्वर’ म्हटले जाते कारण इथले हवामान इतर किनारपट्टीच्या तुलनेत थोडे सुखद असते. मुरूड बीच, हर्णे बंदर, कड्यावरचा गणपती (आंजर्ले) आणि उन्हावरे येथील गरम पाण्याचे झरे प्रसिद्ध आहेत.डॉल्फिन सफारी हे येथील मुख्य आकर्षण आहे.

    प्रवासासाठी काही टिप्सो

    उन्हाळी सुट्टीत खूप गर्दी असते, त्यामुळे हॉटेल आणि ट्रेनचे बुकिंग आधीच करा. तसंच, उन्हाळ्यात कोकणातील ताजी सोलकढी आणि आंबा पन्हे शरीर थंड ठेवण्यासाठी उत्तम आहेत