अलिबाग – आजकाल ऑनलाइन फ्रॉडमुळे अनेकांची झोप उडाली आहे. एका चुकीच्या क्लिकमुळे लोकांची बँकखाती साफ होताहेत. काही मिनिटांत कर्ज मिळते, या आकर्षणाला बळी पडून अनेक नागरिक कर्ज अॅपच्या जाळ्यात अडकत आहेत. किरकोळ रकमेच्या गरजेपोटी आधार कार्ड, पॅन कार्डसह अन्य गोपनीय माहिती अॅप डाउनलोड करताना दिली जाते. मात्र, याच निष्काळजीपणाचा गैरफायदा घेत अनेक कर्ज अॅप्स नागरिकांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक करीत आहेत.
विशेष म्हणजे फसवणूक झाल्यानंतरही बदनामीच्या भीतीपोटी अनेकजण तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, त्यामुळे अशा अॅप तयार करणाऱ्यांचे फावते. सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाइल हा माहितीचा खजिना असतो, याची पुरेशी जाणीव अनेकांना नसते. काही कर्ज अॅप्स अवघ्या काही मिनिटांत पैसे देण्याचे आमिष दाखवतात. एक हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेतल्यानंतर दहा दिवस, पंधरा दिवस, किंवा महिन्याभरात परतफेड करण्याची अट असते. मात्र, प्रत्यक्षात या अॅपद्वारे अधिक व्याज, प्रक्रिया शुल्क आणि दंड आकारला जातो.
काही वेळा नागरिक पैसे भरून मोकळे होतात. मात्र, अनेक प्रकरणांत पैसे दिल्यानंतरही पुन्हा पैशांची मागणी केली जाते. यासोबतच मोबाइलमधील संपर्क, फोटो किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून बदनामीची भीती दाखवली जाते. या मानसिक दबावामुळे ‘तक्रार न केलेलीच बरी’ असे म्हणत अनेकजण आपले पैसे भरून सुटका करून घेतात. सायबर विभागाकडे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचे काही गुन्हे नोंद आहेत.
कर्ज अॅपच्या संदर्भातील तक्रारींचे प्रमाण तुलनेने कमी असले, तरी इतर तांत्रिक मार्गाने झालेल्या फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, तक्रारी न झाल्याने अशा अॅप्सना आळा बसत नाही आणि नवीन ग्राहकांना फसवण्याचे प्रकार सुरूच राहतात.
फसवणूक झाल्यास बदनामीची भीती न बाळगता थेट सायबर विभागाशी संपर्क साधावा तसेच जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. रीतसर अर्ज करून पुढील कायदेशीर कारवाईस सामोरे गेल्यासच अशा कर्ज अॅपच्या वाढत्या फसवणुकीला आळा घालता येईल. त्यासाठी जनजागृती गरजेची आहे. – रिझवाना नदाफ, पोलिस निरीक्षक, सायबर सेल
फसवणूक टाळण्यासाठी काय करावे ?
कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. अॅप डाउनलोड करताना मोबाइलवरील संपर्क, फोटो, कॅमेरा यांसाठी परवानगी (अलाऊ) देताना विशेष खबरदारी घ्यावी. फेसबुक, जीमेल, व्हॉट्सअॅपवरून येणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवण्याआधी खात्री करावी. शक्यतो अनधिकृत, माहित नसलेले कर्ज अॅप मोबाइलमध्ये डाउनलोड करू नयेत.
