Bhagat Singh Koshyari : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरून राज्यातील विरोधी पक्षांनी केंद्रावर टीका केली. संजय राऊतांनीही यावरून आगपाखड केली आहे. दरम्यान, त्यांच्यावर होणाऱ्या टीकेवर भगत सिंह कोश्यारी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
“माझी कोणी प्रशंसा करावी किंवा निंदा करावी म्हणून मी काम करत नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे. भारतामाता माझ्यासाठी सर्वकाही आहे. त्यासाठी मी काम करत असतो आणि काम करत राहणार. हे काम करत असताना कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला मी काय करणार?” असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
भगतसिंह कोश्यारी हे २०१९ ते २०२३ या दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल होते. भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल या पदावर असताना त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा वाद निर्माण झाले. भगतसिंह कोश्यारी यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केले होते. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. परिणामी भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
संजय राऊत यांनी काय म्हटलं?
“महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपाचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान”, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
रघुवीर खेडकर, आर्मिडा फर्नांडिस आणि श्रीरंग लाड यांनाही पुरस्कार जाहीर
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातीलच अर्मिडा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. परभणीचे श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ते एक शेतकरी आहेत. त्यांनी कापूस या पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केलेले आहे. त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यासह महाराष्ट्रातीलच भिकल्या लाडक्या धिंडा यांना देखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
