मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलिसांची भरती करण्याच्या निर्णय गृहखात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यावरून विरोधकांकडून राज्य सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र डागलं आहे. "देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याचं डोक फिरलं की काय? मुंबईचे पोलीस दल जगात दोन नंबरचे आहे. त्या दलात ११ महिन्यांसाठी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. पैसे घेऊन बदल्या करण्यात येतात. पोलीस खात्यात अनागोंदी कारभार सुरु आहे," असा आरोप भाई जगताप यांनी केली आहे. हेही वाचा : VIDEO : “टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही, कधीतरी…”, भाजपाचा थेट अमित ठाकरेंवर हल्लाबोल "गेल्या चार महिन्यांपूर्वी पोलीस भरती झाली होती. तेव्हा पदव्युत्तर असलेली मुलं नोकरीच्या आमिषाने मुंबईत आली. त्यांना कोणत्याही पद्धतीची सोय करण्यात आली नव्हती. यावेळी एका तरुणाचा साप चावून मृत्यूही झाला होता. या पोलीस भरतीचं काय झालं? एखाद्या ठिकाणी मोठा अपघात किंवा घटना घडली, तर हे कंत्राटी पोलीस काय करणार?" असा सवाल भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा : काँग्रेस आमदाराचा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबद्दल मोठा दावा; म्हणाले… "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. मात्र, पोलीस आणि सैन्यात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. याने महाराष्ट्र आणि देश कसा चालणार? देवेंद्र फडणवीस हा निर्णय रद्द करतील," अशी अपेक्षा भाई जगताप यांनी व्यक्त केली.