कृषी कायद्यांना विरोध म्हणून किसान अधिकार अभियान संघटनेने वर्धा नागपूर महामार्गावर भजन सत्याग्रह करीत लक्ष वेधून घेतले. आजच्या भारत बंदला समर्थन म्हणून हे आंदोलन सुरू असल्याची महिती प्रवर्तक अविनाश काकडे यांनी दिली. 

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हे कायदे आहेत. हे कायदे त्वरित रद्द करण्याची सुबुद्धी केंद्र सरकारला मिळो. यासाठी भजन म्हणत साकडे घातले जात असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. यापूर्वो संघटनेने सलग सहा महिने बैठका, सत्याग्रह करीत विरोध दर्शविला होता. त्या आंदोलनास दिल्ली स्थित नेत्यांनीही भेट दिली होती. सकाळी दहा वाजेपासून हे आंदोलन सुरु आहे.

या आंदोलनातील सुदाम पवार, गोविंद पेटकर, प्रफुल्ल कुकडे, कवडुजी व अन्य पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील वाहने अडवून भूमिका मांडली. या सोबतच शहरातील अन्य भागात वेगवेगळे शेतकरी समूह कृषी कायद्यांना विरोध दर्शवित आंदोलन करीत आहे.