भंडारा : झुडपात बसलेल्या वाघाला घेरून अगदी काही फुटांच्या अंतरावरून त्याच्यासोबत सेल्फी घेतल्याचा संतापजक प्रकार भंडारा वन विभागाच्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील कोतुर्ली गावाजवळ आठवडा भरापूर्वीच घडला होता. आज पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती झाली. मुक्तसंचार करता करता आज तोच वाघ लाखांदूर तालुक्यातील हरदोली गावाजवळ पोहोचला. झुडुपात वाघ असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि वाघ पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. काही अतिउत्साही आणि उपद्रवी तरुणांनी चक्क त्या वाघाच्या जवळ जाऊन सेल्फी घेत चित्रफीत बनवली. नागरिकांनी अक्षरशः वाघाला डिवचण्याचा वेडेपणा केला. त्यानंतर नागरिकांच्या या वागण्यामुळे अखेर वाघाला जेरबंद करण्याचा निर्णय वन विभागाला घ्यावा लागला.

लाखांदूर तालुक्यातील हरदोली येथे आज झुडुपात दिसलेला वाघ हा सुहानी वाघिणीचा बछडा आहे. सुहानी वाघिणीला दोन बछडे आहेत. त्यापैकी हा एक असून त्याचे वय अंदाजे २२ महिने आहे. तरुणावस्थेत असल्याने तो मादीच्या शोधात आणि स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी नवीन जंगलाच्या शोधात भटकंती करीत आहे. दवडीपार, धारगाव, पुरकाबोडी, किटाडी, मांगली असा प्रवास करीत तो आता लाखांदूर, हरदोली तई येथे पोहोचला. आज झुडपात वाघ असल्याचे समजताच गावकऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थांनी त्याला अक्षरश: घेराव घालून काही उपद्रवी लोकांनी त्याच्यासोबत फोटोसेशन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. हा व्हिडीओ आता समाजमाध्यमांवर चांगलाच प्रसारित होत असून नागरिकांच्या या वागण्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. ज्यामुळे आता वन विभाग ॲक्शन मोडवर आले आहे. भंडारा वन विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली असून वाघाला जेरबंद करण्याची तयारी सुरू झाली आहे. वाघाला त्रास देणाऱ्या नागरिकांवर वन्यजीव अधिनियमानुसार कडक कारवाई होणार असल्याची माहिती भंडारा उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी दिली.

हेही वाचा – बुलढाणा : सिनेस्टाईल पाठलाग, पिस्तूलच्या धाकावर दीड लाख लुटले, तब्बल सहा दरोडेखोरांनी…

हेही वाचा – यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

वाघासोबत स्वतःच्याही जिवाला नागरिकांच्या या उपद्रव्यमूल्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी वाघाला त्रास दिल्यास त्यांच्यावर वन अधिनियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा वन विभागानं दिला आहे. जनावरांची झालेली शिकार, वाघ आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी आणि नागरिकांकडून वारंवार या वाघाला त्रास दिला जात असल्याने त्याला जेरबंद करण्याची वेळ आली आहे. नागरिकांच्या उपद्रव्यमूल्यामुळेच आता या वाघाला जंगलात मुक्तसंचार करण्याऐवजी जेरबंद व्हावं लागत असल्याची खंत माजी मानद वन्यजीव रक्षक तथा वाईल्ड वॉच संस्थेचे नदीम खान यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader