अकोले: मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असून मान्सूनचे उशिरा आगमन होऊनही जून महिन्यात पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर येथे महिनाभरात १ हजार ३०० मिमी पावसाची नोंद झाली तर प्रवरा नदीचे उगमस्थान रतनवाडीमध्ये यापेक्षाही जास्त म्हणजे १ हजार ३२७ मिमी पाऊस महिनाभरात कोसळला. जूनच्या मध्यानंतर पाऊस सुरू झाला. काल, सोमवारी दिवसभर घाट माथ्यावर पावसाची संततधार सुरू होती.
जूनमधील विक्रमी पावसामुळे भंडारदरा धरण ६० टक्के भरले. मुळा आणि निळवंडे ही धरणे ५० टक्के भरली. आढळा व भोजापूर भरण्याच्या मार्गावर आहेत. सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ६ हजार ७३२ दलघफूट (६०.५८ टक्के), निळवंडेचा ४ हजार २५८ दलघफूट (५१.१३ टक्के) झाला होता. मुळा धरणाचा सायंकाळचा पाणीसाठा १२ हजार ९९८ दलघफूट होता. आढळा धरण ९३.४९ टक्के भरले असून सायंकाळी आढळा धरणात ९९१ दलघफूट पाणीसाठा झाला होता.
काल कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगडाच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. रतनवाडी येथे १०२ मिमी. तर अन्य ठिकाणीही असाच जोरदार पाऊस झाला. डोंगरकड्यावरून लहान मोठे धबधबे जोमाने कोसळत असून ओढे नाले खळाळत वाहू लागले आहेत. तुडुंब भरलेली भात खाचरे ओसंडून वाहत आहेत. मुळा नदी परत दुथडी भरून वाहू लागली आहे. धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक वाढली आहे.
उत्तर नगर जिल्ह्याचे लक्ष लागलेले भंडारदरा धरण ६० टक्के भरले आहे. धरणात पाण्याची चांगली आवक सुरूच आहे. कृष्णवंती ही प्रवरेची उपनदी जोमाने वाहत असल्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यातही चांगली वाढ सुरू आहे. आज सकाळी निळवंडे धरणाचा पाणीसाठा ४१४९ दलघफूट (४९.८७ टक्के) झाला.
जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमतेचे मुळा धरणही निम्मे भरले आहे. सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा १२ हजार ८०१ दलघफूट (४९.२३ टक्के) होता. मुळा नदीच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. आढळा ९८६ दलघफूट ( ९३.०२) आणि भोजापूर ३४० दलघफूट (९४.१८) ही लहान धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.
विविध ठिकाणी मागील चोवीस तासांत पडलेला पाऊस मिमी. मध्ये पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे एक जूनपासून आजपर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. भंडारदरा ७२ (८५३), घाटघर ९५ (१ हजार ३००), रतनवाडी १०२ ( १ हजार ३२७ ), पांजरे ८३ ( ८७०), निळवंडे ३८ ( ४०३), आढळा धरणस्थळ ४ (९६), कोतुळ १० (२१२), अकोले २४ (३०२)