अकोले: भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेले सुमारे २३ टीएमसी पाणी, प्रवरेच्या पाण्यावर झालेली २ कोटी ७८ लाख युनिट वीजनिर्मिती, निळवंडे धरणातून जायकवाडीकडे वाहिलेले ८ टीएमसी पाणी, घाटघरला पडलेला ४ हजार ७३ मिमी पाऊस, पांजरे येथे कळसूबाई शिखराची कोसळलेली दरड, अतिवृष्टीमुळे घरांचे, शेतीचे, रस्त्यांचे झालेले नुकसान. हा आहे पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यातील निळवंडे, भंडारदरा पाणलोट क्षेत्राचा लेखाजोखा.

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर या वर्षी मान्सूनच्या पावसाची सुरवात निराशाजनक झाली. जून महिना जवळपास कोरडा गेला. मात्र जुलैच्या पावसाने कसर भरून काढली. ऑगस्टमध्येही धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे धरणे तर तुडुंब भरलीच पण त्याबरोबरच निळवंडेमधून जायकवाडीलाही सुमारे ८ टीएमसी पाणी वाहिले.

प्रवरा नदीवर भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी १२ मेगावॉट क्षमतेचे तर रंधा धबधब्याजवळ कोदनी येथे ३४ मेगावॉट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प आहेत. तर निळवंडे धरणाच्या पायथ्याशीही ७ मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्प आहे. पावसाळ्यात धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे या तीन वीज प्रकल्पांमधून १ जूनपासून आज पर्यंत सुमारे १ कोटी ७८ लाख युनिट वीजनिर्मिती झाली आहे.

भंडारदरा धरणात आजपर्यंत १७ हजार ४४१ दलघफु नवीन पाणी आले. धरण भरल्यानंतर यातील ९ हजार ३३५ दलघफू पाणी सोडण्यात आले. यातील ३ हजार २१४ दलघफू पाणी भंडारदरा वीज प्रकल्पांमधून सोडण्यात आले. त्यावर तीन महिन्यात १ कोटी ५६ लाख ३१ हजार युनिट वीज निर्मिती झाली.
तर याच कालावधीत कोदणी प्रकल्पातून ५१ लाख ७१ हजार युनिट वीजनिर्मिती झाली. या प्रकल्पाची क्षमता ३४ मेगावॉट असली तरी निळवंडे धरणाची पाणी पातळी वाढल्यानंतर या प्रकल्पाची वीजनिर्मिती बंद पडते.आता निळवंडे धरणाची पाणी पातळी कमी झाल्यानंतरच हा प्रकल्प पुन्हा सुरू होईल.

निळवंडे धरणात या कालावधीत १४ हजार ४८२ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. निळवंडे धरणाच्या स्पिलवे मधून ५ हजार ५०० दलघफू, कालव्यातून ५५ दलघफू तर वीज केंद्रातून २ हजार ५४८ दलघफू असे एकूण ८ हजार १०३ दलघफू पाणी सोडण्यात आले. वीज केंद्रातून सोडलेल्या पाण्यावर तीन महिन्यात सुमारे ७० लाख युनिट विजेची निर्मिती झाली. वीजनिर्मिती केंद्र आणि स्पीलवे मधून सुमारे ८ टीएमसी पाणी निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पडले. हे पाणी जायकवाडीकडे गेले.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तीन महिन्यात येथे पडलेल्या पावसामुळे सुमारे १७.५ टीएमसी पाणी उपलब्ध झाले. निळवंडे धरणात आजपर्यंत १४ हजार ४८२ दलघफू नवीन पाणी आले. यातील ९ हजार ३३५ दलघफू पाणी भंडारदरा धरणातून सोडलेले व निळवंडेमध्ये जमा झालेले आहे तर ५ हजार ५४७ दलघफू पाणी निळवंडेच्या पाणलोट क्षेत्रातील आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील साडेसतरा टीएमसी आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रातील साडेपाच टीएमसी असे जवळपास २३ टीएमसी पाणी घाटघर ते निळवंडे या प्रवरा पट्ट्यात तीन महिन्याच्या पावसाने उपलब्ध झाले आहे.
पाणलोट क्षेत्रातील पाऊस आता जवळपास थांबलाच आहे.