वसई-विरार : केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्या विरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला, वसई- विरार परिसरात उत्स्फू र्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सकाळपासूनच शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
वसई-विरार नालासोपारा या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी तसेच इतर राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. सामाजिक संघटना आणि कामगार संघटना, रिक्षा संघटना यांनीसुद्धा या बंदला प्रतिसाद देत बंदचे पालन केले. वसईतील ६० टक्क्यांहून अधिक औद्योगिक वसाहतीसुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
शेतकरी कायद्याविरोधातील भारत बंदला वसई विरार परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापारी संघटनांनी स्वच्छेने शेतकरी आंदोलनाला समर्थन करत आपली दुकाने बंद ठेवली. किरकोळ घटना वगळता शांततेत हा बंद पार पडला. शहरात काही ठिकाणी दूध, भाजी मार्केट, औषधांची दुकाने आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. त्याचबरोबर कार्यालयांना सुट्टी नसल्याने रिक्षा आणि इतर प्रवासी साधने सुरळीत सुरू होती. बंद असल्याने रस्त्यांवर गर्दीचे प्रमाण कमी होते.
राजकीय पक्षाची निदर्शने
भारत बंदला प्रतिसाद देत राष्ट्रवादीतर्फे शहरात ठीक ठिकाणी निदर्शने करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या वतीने वसई माणिकपूर तसेच नायगाव भागातही राष्ट्रवादीतर्फे निदर्शने करण्यात आली. विरारमध्ये भाजपाचे माजी उपजिल्हा अध्यक्ष सचिन राऊत यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन देत. आपला भाजपच्या सर्व पक्षाचा राजीनामा दिला. केंद्र सरकारने कृषी कायद्यात आवश्यक बदल करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. सकाळी बहुजन समाज पक्षातर्फे विरार पूर्वेच्या नारंगी येथे रस्ता रोको करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी जिल्हा संघटक प्रा. डी. एन. खरे यांना ताब्यात घेतले होते. नालासोपारा परिसरात रिक्षा संघटनांनीसुद्धा या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवत २ तास रिक्षा बंद ठेवून शेतकऱ्यांना समर्थन देत केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
वसईतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडी यांनीसुद्धा या बंदला आपले समर्थन दिले होते. पक्षाने बंदचे आवाहन केले होते. त्याचा परिणाम बघायला मिळाला. बविआच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक सामाजिक संस्थांनीसुद्धा या आंदोलनाला समर्थन देत शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दर्शविला.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वसई विरार परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालये, शहरातील नाके तसेच तीनही रेल्वे स्थानकात पोलीस तैनात करण्यात आले होते. शहरात किरकोळ घटना सोडता कुठेही अनुचित प्रकार नसून बंद शांततेत पार पडल्याचे वसई पोलीस उपयुक्त संजयकुमार पाटील यांनी सांगितले.
भाईंदरमध्ये महामार्गावर आंदोलन
देशव्यावी बंद पुकारण्यात आलेल्या निर्णयाला मिरा भाईंदर शहरातून प्रतिसाद देण्यात आला. यात प्रामुख्याने मिरा रोड रेल्वे स्थानक आणि राष्ट्रीय महामार्गावर शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शन केले. केंद्र शासनाकडून लागू करण्यात आलेल्या शेतकरी कायद्याविरोधात मिरा भाईंदर शहरातील मिरा रोड स्थानक, नवघर, पूनम नगर, काशी मिरा आणि नया नगर परिसरात दुकान बंद करून प्रदर्शने करण्यात आली. यात शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्टीय महामार्गावर धरणे आंदोलन करत केंद्र सरकार विरोधी घोषणा दिल्या. तर नवघर परिसरात प्रदर्शन करत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले.
समाजमाध्यमांवर समर्थनाचा पाऊस
शेतकरी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या पोस्टचा पाऊस समाजमाध्यमांवर पाहायला मिळाला. यात फेसबुक, ट्वीटर, व्हॉटसअप आणि इतर माध्यमांद्वारे हजारो नागरिकांनी आपले समर्थन या आंदोलनाला दर्शविले आहे.
