“अजित पवारांनी भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवला”

भाजपा आमदाराचा आरोप; मिहानमध्ये होणार होता प्रकल्प

ajit pawar uddhav thackeray
१२ आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडीकडून सातत्याने राज्यपालांवर टीका होत आली आहे. शिवसेनाही सातत्याने टीका करत असून, भाजपाने संजय राऊत यांनाही सवाल केला आहे. (फोटो सौजन्य : Twitter/AjitPawarSpeaks वरुन साभार)

हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीला पुण्यात लस निर्मिती प्रकल्पासाठी जागा देण्यात आली असून, सरकारने २८ एकर जागा कंपनीला हस्तांतरित केली आहे. त्याचबरोबर आवश्यक यंत्रसामग्रीसह इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. दरम्यान, या भारत बायोटेकच्या पुण्यातील प्रकल्पावरून भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. प्रकल्प विदर्भात होणार होता, मात्र पवारांनी तो पुण्याला पळवला, असं खोपडे यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे. “नागपूरमधील मिहान परिसरात सिरम आणि भारत बायोटेकला निमंत्रित करण्यात आले होतं. भारत बायोटेकची इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करम्यात आली होती. तसेच सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्याचे निर्देशही दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मिहान प्रोजेक्टबद्दल माहिती होती. असं असतानाही विदर्भावर अन्याय करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबाबत त्यांनी शब्दही काढला नाही,” असं खोपडे म्हणाले.

“नवे प्रकल्प आणण्याची हिंमत नसलेल्या विदर्भातील नेत्यांनी किमान आलेले प्रकल्प थांबवण्याची सुद्धा हिंमत दाखवली नाही. विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प आणण्यासाठी अधिकारी धडपड करतात. मात्र त्यांना राजकीय स्थान मिळत नाही. त्यामुळे ते पळविले जातात. ही विदर्भासाठी दुर्दैवी बाब असून, पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह काँग्रेसचे नेते गप्प का बसले?; असा सवाल खोपडे यांनी केला आहे.

२८ एकर जागा भारत बायोटेककडे हस्तांतरित

हैदराबाद येथील भारत बायोटेक कं पनीला पुण्यातील मांजरी खुर्द येथील २८ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील जागा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तातडीने कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. लसनिर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्री देखील या ठिकाणी पोहोचली आहे. लस उत्पादनासाठी लागणारी सेवा आणि ती देणाऱ्या कंपन्यांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात आले आहे. परिणामी येत्या तीन महिन्यांत पुण्यात प्रत्यक्षात कोव्हॅक्सिन लसनिर्मिती होईल, अशी माहिती अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bharat biotech plant in pune ajit pawar krushna khopade political allegations bmh

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या